Invitation To President For Simhasth Flag Hoisting Ceremony
सिंहस्थ ध्वजारोहणासाठी आज राष्ट्रपतींना निमंत्रण
Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींना आज, बुधवारी (दि. २१) या सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री आणि महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे शिष्टमंडळ अधिकृत निमंत्रण देणार आहे.
सिंहस्थाचा ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले जाणार आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला भेटी देऊन सायंकाळी महागोदाआरतीला उपस्थित राहतील. मुख्यमंत्री फडणवीस आणि नाशिकच्या महापौर राष्ट्रपतींना निमंत्रण देणार आहेत. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचा समावेश आहे. निमंत्रणासाठी राष्ट्रपती कार्यालयाकडून दुपारी १२ वाजेची वेळ देण्यात आली आहे.राष्ट्रपती मुर्मू यांना ध्वजारोहण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेसोबत आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. शबरी विकास महामंडळाने आदिवासींच्या वस्तूंसाठी विकसित केलेल्या शबरी नॅचरल्स ब्रँडमधील नोंदणीकृत निवडक १७ वस्तूंची राष्ट्रपतींना भेट दिली जाणार आहे. त्यात मोहाचे लाडू, बांबूची उत्पादने, अगरबत्ती, पौष्टिक तृणधान्ये, आकाशकंदील यांचा समावेश आहे.