बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला ठार

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,सटाणा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला ठार
बागलाण तालुक्यातील ठेंगोडा व सावकी शिवारात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांत तीन महिलांवर हल्ले केले असून, मंगळवारी (दि. २०) पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४० वर्षीय मेंढपाळ महिला ठार झाली. मृत महिलेचे नाव शोभाबाई (बेबीबाई) सुखदेव बोरकर असे आहे. हे मेंढपाळ कुटुंब मालेगाव तालुक्यातील बिरोबा साकूर येथील आहे.

शोभाबाई बोरकर आणि त्यांचे पती सुखदेव बोरकर हे गेल्या महिनाभरापासून ठेंगोडा शिवारात बंटी सुदाम बोरसे यांच्या ठेंगोडा ते सावकी शिवारातील शेतात मेंढपाळ म्हणून काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आले होते. मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास शोभाबाई या शौचालयासाठी गेल्या असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने त्यांना सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर ओढत नेले. तेथील काटेरी झुडपांमध्ये ठिकठिकाणी लचके तोडलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या चेहरा, मान व पाय तसेच शरीराच्या विविध भागांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या जखमांतून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १२ वाजता सटाणा येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेमुळे ठेंगोडा शिवारासह परिसरातील शेतकरी, मेंढपाळ आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सटाणा, देवळा, नाशिक येथील वनविभागाचे कर्मचारी व जवानांचा ताफा, नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी सावकी व ठेंगाढा शिवारात तातडीने दाखल झाला आहे.