Tiranga Political Controversy And Uddhav Thackerays Questions
‘तिरंग्याबद्दल द्वेष कायम आहे का?’
Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘आज देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. दिल्लीत जंतर मंतर येथे उतरलेल्या ‘जेन झी’वर तुमचे पोलिस तुटून पडले. त्यांच्यावर भयानक अत्याचार सुरू असून, आता सरसंघचालक मोहन भागवत हे आंदोलनातील सभ्यतेबाबत बोलत आहेत. तिरंगा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणांना तुम्ही अमानुष मारहाण करीत आहात. अशावेळी तिरंग्यावरून तुमच्यावर जी टीका होत होती, त्या तिरंग्याचा द्वेष आजही कायम आहे का’, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून विचारला.
‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता भीमनवार रजेवर गेले. मग, ज्ञानेश कुमार यांचा का राजीनामा घेत नाही? कारण तुमच्या रावणाचा जीव ज्ञानेश कुमार नावाच्या बेंबीत अडकला असून, त्यासाठीच तुम्ही त्याला वाचवत आहात’, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. अशक्य गोष्टी लोकांना सांगून त्यांना संभ्रमित करून त्यांची मते घेतली जात आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर केला. ‘विद्यापीठातून, अभ्यासक्रमातून पुस्तके काढण्याचा घाट सध्या घातला जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके काढून टाकण्याचा हा डाव असून तुम्ही असे करूनच दाखवाच, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.‘डॉ. सिंग यांच्यावरील आरोप ‘रेजिम चेंज’साठीच’
भाजपने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे ‘रेजिम चेंज’साठीच होते, असा दावा उद्धव यांनी केला. देशात भविष्यात जे सत्ताबदलाचे रणकंदन होईल त्यात महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपणार आहे’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘लॉरेन्स बिष्णोईला खेचून आणा’
कायदा-सुव्यवस्थेवरून ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘टायगर श्रॉफवरील हल्ल्यातील हल्लेखोर पकडले, याचे कौतुक कसे करायचे? गोळी लागली असती तर काय झाले असते? सुदैवाने टायगर श्रॉफ वाचला’ असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांमध्ये खरोखरच दम असेल, तर त्यांनी साबरमती तुरुंगातील गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईला खेचून आणावे’, असे ते म्हणाले.
‘रुसू बाई रुसू, गावी जाऊन बसू’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला बहुभाषिक म्हटल्यावर काही जण शांत बसले, अशी टीका करत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘रुसू बाई रुसू आणि गावी जाऊन बसू, अशी त्यांची अवस्था आहे’ अशी टीका ठाकरे यांनी केली. ‘टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर हे चमको लगेच पाहायला गेले. सहा गद्दार फोडले, त्यांना ५० खोके दिले; पण दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयेच दिले जाणार आहेत’, असे ठाकरे म्हणाले.
राज्यात दुष्काळाचे चटके अजून पुरेसे जाणवत नसले, तरी यंदाचा दुष्काळ आक्राळविक्राळ असेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. कर्जमाफी जाहीर झाली; मात्र ती कोणालाच मिळालेली नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.