गरब्याच्या कार्यक्रमात वाद, युवकावर हल्ला

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
knife attack on youth at garba event manhunt for suspects underway
दारू पिऊन गरब्याच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यास मनाई केल्याने युवकावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मनीषनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

क्रिष्णा श्यामलाल बरादिया (वय १९, रा. ८५ प्लॉट एरिया, अजनी) असे जखमीचे नाव आहे. पीयूष ऊर्फ नोबी आणि तेजस ढोंगे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. क्रिष्णा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. त्याच्याकडे मनीषनगरमधील गरबा कार्यक्रमाचे आयोजन होते. सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पीयूष साथीदारांसह दारू पिऊन कार्यक्रमात आला. त्याने शिवीगाळ करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांना बाहेर काढले. त्यानंतर पीयूष तेथून निघून गेला. काही वेळाने पीयूष साथीदारांसह क्रिष्णाच्या घरासमोर गेला. त्याने मोबाइलवर संपर्क साधून क्रिष्णाला घरी बोलाविले. क्रिष्णा घरी येताच पीयूष आणि त्याच्या साथीदारांनी चाकूने त्याच्यावर वार केले आणि पसार झाले. क्रिष्णाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.