लखनौ हत्याकांडातील मारेकरी उपराजधानीत गवसले

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लखनौ हत्याकांडातील मारेकरी उपराजधानीत गवसले
संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडविणाऱ्या लखनौ येथील व्यापारी शिवा शर्मा हत्याकांडातील दोन महिलांसह तिघांना उपराजधानीत अटक करण्यात आली. गुन्हेशाखा पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक दानिश ऊर्फ तन्वीर अली यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयातून ७२ तासांचा ट्रान्झिट रिमांड घेऊन पोलिस तिघांनाही लखनौला घेऊन रवाना झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धा आणि शिवा यांच्यात मैत्री होती. ९ ऑक्टोबरला चौथ्या माळ्यावरून पडून शिवा यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी या प्रकरणात श्रद्धा, रश्मी आणि दानिश यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर तिघेही लखनौमधून पसार झाले. ते नेपाळला गेले होते. श्रद्धा वायफायचा वापर करून आपण निर्दोष असल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर पोस्ट करीत होती. तिच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी श्रद्धा कानपूरला आली. १८ ऑक्टोबरला रात्री श्रद्धा, रश्मी आणि दानिश हे तिघे यूपी-७८-एफएक्स-१६७८ क्रमांकाच्या कारने नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती लखनौ एसटीएफला मिळाली. लखनौ पोलिसांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर गुन्हेशाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू झाली.

१९ ऑक्टोबरला सायंकाळी गणेशपेठ बसस्थानक परिसरात कार आढळली. चालकाच्या चौकशीत बुरखा घातलेल्या दोन महिला आणि एक पुरुष ई-रिक्षाने गेल्याचे समोर आले. पोलिसांनी सुमारे २५० सीसीटीव्ही फूटेज तपासत चिचभवनपर्यंत माग काढला. दरम्यान, श्रद्धाने प्रोझोन काल्म इमारतीतील फ्लॅटमधील वायफायवरून व्हॉट्सॲप कॉल केल्याची माहिती मिळाली. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तिचे लोकेशन निश्चित करण्यात आले.

गुन्हेशाखा आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मंगळवारी प्रोझोन काल्म इमारतीत पोहोचले. सुरक्षा रक्षकाला तिघांची छायाचित्रे दाखविल्यानंतर ते अकराव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बेल वाजवली; मात्र दरवाजा उघडला नाही. अखेर दरवाजा तोडून तिघांना अटक करण्यात आली. कार आणि फ्लॅटची व्यवस्था करून देणाऱ्या आमिरलाही लखनौमध्ये अटक करण्यात आली आहे.