Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘शहराच्या हमरस्त्यांवर बॅरिकेडिंग, प्रचंड फौजफाटा, इंटरनेट आणि प्रवासावर बंदी या सर्व जम्मू आणि काश्मीर राज्याची ‘वैशिष्ट्ये’ बनली होती. आता दिल्ली, मुंबई आणि काही शहरांची अवस्था तशीच झाली आहे. केवळ सरकारची मनमानी सुरू आहे; पण जनता जागरूक होत आहे, रस्त्यावर उतरून विरोध करीत आहे, हे चांगले लक्षण आहे,’ अशी प्रतिक्रिया काश्मीरचे आमदार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) केंद्रीय समितीचे सदस्य युसूफ तारिगामी यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दडपशाहीविरोधात आंदोलने का होत नाहीत, यावर बोलताना तुरुंगात कैद्यांनी आंदोलन केले, तरी त्याची दखल घेतली जात नाही, असे तारिगामी म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बुधवारी ‘देशातील सध्याची राजकीय परिस्थिती’ याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी तारिगामी यांनी काश्मीरच्या जनतेच्या तोंडाला केंद्र सरकारने पाने पुसल्याची टीका केली.