नवकल्पनांना व्यासपीठ

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवकल्पनांना व्यासपीठ
राज्यातील तरुण नवोन्मेषक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअपना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरअंतर्गत कार्यरत ‘गाव तिथे उद्योजक इनक्युबेशन कौन्सिल’ यांच्यात बुधवारी करार करण्यात आला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा करार झाला. राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर आहे. सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी उपाय शोधण्यासाठी अधिकाधिक स्पर्धकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, हा या कराराचा प्रमुख उद्देश असल्याचे लोढा यांनी सांगितले.
या करारांतर्गत राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्पर्धेबाबत माहिती दिली जाणार आहे. निवडक नवोन्मेषक आणि स्टार्टअपना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक साह्य तसेच उद्योग क्षेत्राशी जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देऊन त्यांना रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनविण्याचा प्रयत्न या सहकार्यातून केला जाणार आहे,’ असे लोढा यांनी स्पष्ट केले.

‘गाव तिथे उद्योजक इनक्युबेशन कौन्सिल’चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी ग्रामीण भागातील युवक, महिला आणि स्थानिक कारागिरांमध्ये व्यवसाय सुरू करण्याची क्षमता मोठी असल्याचे सांगितले. मात्र मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती यांचा अभाव असल्याने त्यांच्या प्रगतीला मर्यादा येतात, असे ते म्हणाले. ही दरी भरून काढण्यासाठी संस्था गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत काम करत आहे. ३६ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने उद्योगविषयक मार्गदर्शन आणि रोजगारनिर्मितीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेसाठीही संस्था सक्रिय सहकार्य करणार असल्याचे माणगावे यांनी नमूद केले.