Uddhav Thackeray Issues Warning Of Political Change Defiance From Gen z
सत्ताबदल अटळ : उद्धव ठाकरे
Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘देशात याआधी ज्या तरुणांच्या पिढीने क्रांती केली ते आताच्या ‘जेन-झीं’च्याच वयाचे होते. अन्यायाच्या विरोधात क्रांतिकारक पेटून उठले; तशीच आजच्या जेन-झींची पिढी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. आज तुम्ही त्यांना झुरळ, शहरी नक्षली म्हणून हिणवत असला, तरी देशात पुन्हा पुन्हा क्रांतिकारकांची परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जो अत्याचार केला आहे, त्याची फळे या दोघांना भोगावी लागणार आहेत,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला. तुम्ही आमच्या मतांचा अधिकार हिसकावून घेत असल्याने आम्ही सत्ताबदलासाठी उभे आहोत, असे आव्हानही त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिले.
शिवाजी पार्कवर मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा झाला. व्यासपीठावर आदित्य ठाकरे यांच्यासह दिवाकर रावते, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, सुधीर साळवी, सूरज चव्हाण, मिलिंद नार्वेकर, सुनील प्रभू, भास्कर जाधव आदी नेते उपस्थित होते. उद्धव यांनी सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचे वर्ष, दसरा मेळाव्याचे हीरक महोत्सवी वर्ष आणि शिवाजी पार्क मैदानाच्या नावाला झालेली शंभरी असा योगायोग सांगितला.‘तिरंगा हातात घेणाऱ्या तरुणांना तुम्ही मारत आहात. तिरंग्यावरून तुमच्यावर जी टीका होत होती, त्या ा द्वेष आजही कायम आहे का,’ असा सवाल त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून केला.
‘अमित शहा महाराष्ट्राला बहुभाषक म्हणाले, त्यावर काही जण दाढी खाजवत बसले होते. ‘रुसू बाई रुसू आणि गावी जाऊन बसू’ अशी त्यांची अवस्था आहे. टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यावर हे चमको लगेच गेले पाहायला,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला. ‘सहा गद्दार फोडले, त्यांना ५० खोके दिले आणि दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले, ही तुमची लायकी,’ असेही ते म्हणाले.