मंडप दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक

Contributed by: वृत्तसंस्था,कोलकाता|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मंडप दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक
दुर्गापूजा मंडपाचा काही भाग कोसळत असल्याची घोषणा करून भाविकांमध्ये घबराट पसरवल्याच्या आरोपावरून कोलकाता पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. उत्तर कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

संजीब राहा याला गुरुवारी नादिया जिल्ह्यातून ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली, तर कुशल मजुमदार याला शुक्रवारी कोलकात्यातील गिरीश पार्क परिसरातून पकडण्यात आले. कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दुर्गापूजेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी चोरबागान मंडपात या दोघांनी घोषणा केल्याचे पोलिसांनी सांगितले. मंडपातील सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर त्यांची ओळख पटली. मंडप कोसळत असल्याचा इशारा देत भाविकांना तातडीने बाहेर पडण्यास सांगितल्याचे चित्रणात दिसले. या घोषणांमुळे घबराट पसरली आणि भाविकांनी बाहेर पडण्यासाठी एकाच दिशेने धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
संजीब राहा हा चोरबागान दुर्गापूजा समितीचा खजिनदार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. राहा आणि मजुमदार हे दोघेही कोलकात्यातील अमर बसू सरणी येथे राहतात. हा परिसर पूजास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. राहा याच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.