अर्जुनचे ऐतिहासिक ब्राँझ

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अर्जुन एरिगेसीने जागतिक जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वनाथन आनंदनंतर एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. महिलांच्या अतिजलद स्पर्धेत दिव्या देशमुख सर्वोत्तम भारतीय ठरली. मात्र, चाहत्यांनी अर्जुनच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.

arjun erigaisi celebrating the historic bronze chess player

दिव्या देशमुख महिलांच्या अतिजलद स्पर्धेत भारतीयांत सर्वोत्तम आली. मात्र, तिला १५ फेऱ्यानंतर २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिचे नऊ गुण झाले. सर्वोत्तम आलेल्या आसुबायेवा बिबिसारा हीच्यासह पाच जणींचे प्रत्येकी ११ गुण होते. कोनेरू हम्पीनेही दिव्याप्रमाणेच नऊ गुण मिळवले. चार्वी ए, रमेशबाबू वैशाली, द्रोणावली हरिका यांचे प्रत्येकी ८.५, तर पद्मिनी रौत, प्रियांका नुताकी यांचे प्रत्येकी ७.५ गुण झाले.

भारताच्या अर्जुन एरिगेसीने जागतिक जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत दोन्ही प्रकारांत ब्राँझपदक जिंकले. विश्वनाथन आनंदने यापूर्वी २०१७च्या स्पर्धेत दोन पदके जिंकण्यात यश मिळवले होते. त्यानंतर दुहेरी यश मिळवणारा अर्जुन पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे.

अर्जुन एरिगेसी मंगळवारी सांगता झालेल्या अतिजलदच्या प्राथमिक टप्प्यानंतर १४.५ गुणांसह अव्वल आला होता. मात्र, त्याला उपांत्य फेरीत नॉदिरबेक अब्दुसात्तारोव याच्याविरुद्धच्या लढतीत ०.५-२.५ अशा पराभवास सामोरे जावे लागले. या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूस ब्राँझपदक देण्यात येते. त्यामुळे अर्जुनचा तिसरा क्रमांक निश्चित झाला. त्याने जलद स्पर्धेतही ही कामगिरी केली होती. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो आनंदनंतरचा पहिला खेळाडू ठरला.

चाहते मात्र नाराज

भारतातील बुद्धिबळ रसिकांनी अर्जुनवर टीका केली आहे. ‘तो प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी करून मोक्याच्या वेळी पराभूत होतो,’ अशी टीका चाहत्यांनी केली आहे. त्याहीपेक्षा त्यांना या स्पर्धेतील निहाल सरीनविरुद्धची बरोबरी जास्त खटकत आहे. अखेरच्या फेरीपूर्वी अर्जुनचे प्राथमिक फेरीतील अग्रस्थान निश्चित होते. अर्जुनने निहालविरुद्धची लढत गमावली असती, तर निहाल अब्दुसात्तारोव याला मागे टाकून चौथा आला असता. या परिस्थितीत अर्जुन आणि निहाल यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली असती आणि भारतीयांचे किमान रौप्यपदक निश्चित झाले असते. मात्र, अर्जुनने ही संधी दवडली हा अनेक चाहत्यांचा आक्षेप होता.

प्राथमिक फेरीत प्रभावी

अर्जुनने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत १८ फेऱ्यांत १२ विजय आणि ५ बरोबरी अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती.