पुणे : शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवादापासून ते वैज्ञानिक प्रात्यक्षिके आणि भव्य विज्ञान प्रदर्शनांनी शहरात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. शहरातील संशोधन संस्था आणि प्रयोगशाळा राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या गर्दीने शनिवारी अक्षरशः फुलून गेल्या.
नोबेल विजेत्या ‘रामन इफेक्ट’ या संशोधनाचे निमित्त साधून दर वर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (आयसर) आयोजित विविध उपक्रमांत शनिवारी दिवसभरात शेकडो विज्ञानप्रेमींनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष शास्त्रज्ञांशी संवादाच्या सत्रात प्रा. सौरभ दुबे, प्रा. सिद्धेश कामत, डॉ. गरिमा शर्मा, प्रा. चैतन्य आठले यांनी जीवशास्त्रातील अद्ययावत संशोधनाची उपस्थितांना माहिती दिली.
आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्रात (आयुका) प्रा. अजित केंभावी, प्रा. आर. श्रीआनंद, प्रा. सुहृद मोरे आदी शास्त्रज्ञांनी उपस्थित विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पुणे जिल्हा परिषदेतर्फे नासा, इस्रो आणि संसद भवन व राष्ट्रपती भवनाला भेट दिलेल्या निवडक विद्यार्थ्यांच्या अनुभवकथनालाही प्रतिसाद मिळाला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनालाही प्रतिसाद मिळाला. खोडदच्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाला राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शनिवारी मोठी गर्दी केली. जीएमआरटीचे विज्ञान प्रदर्शन रविवारी दुपारी तीनपर्यंत सुरू राहणार आहे.









