ठाणे जिल्ह्यात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून अवघ्या दहा दिवसांत ११ हजार ९३७ अर्ज दाखल झाले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गतवर्षी २५ हजार ७७३ अर्ज आले होते.
सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ६११ पात्र शाळांमध्ये ११ हजार ५९५ जागा उपलब्ध आहेत. अर्जांची संख्या झपाट्याने वाढत असून अंतिम मुदतीपूर्वी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६ आहे. आरटीई कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक स्तरावर २५ टक्के राखीव प्रवेश दिला जातो. पात्र पालकांनी अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. चुकीची माहिती किंवा एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नसल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
‘आरटीई’अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांची अर्ज नोंदणी राज्य सरकारच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाइन प्रक्रियेत अर्जनोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादींबाबत सर्व माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर आहे.








