दृश्यमानता कमी असल्यानेच अपघात

महाराष्ट्र टाइम्स

A preliminary report by the AAIB suggests low visibility caused the crash of Deputy Chief Minister Ajit Pawar's aircraft near Baramati Airport. The incident resulted in five fatalities. The report highlights faded runway markings and loose gravel. The AAIB has recommended strict adherence to standard operating procedures for operators flying into uncontrolled airports.

दृश्यमानता कमी असल्यानेच अपघात

दृश्यमानता प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष हवाई अपघातांची तपास करणाऱ्या संस्थेने (एएआयबी) काढला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळानजीक २८ जानेवारीला अपघात झाला. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास ‘एएआयबी’ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच शनिवारी या संस्थेने प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला. बारामती येथे धावपट्टीवरील फिकट होत चाललेल्या खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर सैल खडींची उपस्थिती, याकडे बोट दाखवताना ‘एएआयबी’ने नियंत्रण नसलेल्या विमानतळांवर उड्डाणे करणाऱ्या सर्व ऑपरेटरना निर्धारित मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जारी करावेत, अशी शिफारस केली आहे.

‘एएआयबी’ने आपल्या २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे की, ‘बारामती विमानतळाकडे येताना वैमानिकांनी दृश्यमानतेविषयी विचारले होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ३००० मीटर असल्याचे उत्तर मिळाले. लॅण्डिंगला परवानगी देताना हवा साधारण असल्याचे नियंत्रण कक्षाने म्हटले होते. मात्र, व्हीएफआर विमानासाठी दृश्यमानता प्रमाणापेक्षा कमी होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमान जमिनीवर आदळले. त्यावेळी वैमानिकांचे अखेरचे शब्द ‘ओह **... ओह **’ असे होते’. अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांच्या सहकार्याने विमानातील सॉलिड स्टेट कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (एसएससीव्हीआर) डाऊनलोड केला जाईल. सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील (एसएसएफडीआर) डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू असल्याचे ‘एएआयबीने’ स्पष्ट केले आहे.

‘तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा विमान वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे असे वाटेल तेव्हा ते सुरक्षा शिफारशी जारी करू शकतात’, असे एएआयबीने म्हटले आहे.