पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून, येत्या नऊ मार्चला निवडणूक होणार आहे. तेरा तालुक्याच्या ठिकाणी या निवडणुका होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष; तसेच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी येत्या २० मार्चपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला आहे. त्यानुसार, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी कार्यक्रम जाहीर करण्याची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे ७३ आणि पंचायत समितीचे १४६ सदस्य निवडून आले आहेत. त्याबाबत वैधानिक निवडीचे राजपत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पंचायत समिती सभापतिपदासाठीचा पहिला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नऊ मार्चला ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तालुक्यातील निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांना नोटिसा देण्यात येतील. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पंचायत समितीच्या खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर येथील काही सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. मात्र, जिल्ह्यात अन्य कोणत्याही तालुक्यातील सदस्यांकडून प्रशासनाकडे नोंदणी करण्यात आली नाही.









