शहरात संवेदनशील केंद्र नाही..!

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक शहरात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचा अहवाल पोलीस आयुक्तालयाने सादर केला आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर गोंधळ झाला होता, तिथे आता अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने ही पाहणी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांची सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला आहे.

comprehensive inspection of election security in nashik no sensitive centers

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या पथकांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार नाशिकमध्ये सध्या एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नसल्याची नोंद आयुक्तालयाने केली आहे. परंतु, सन २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गोंधळ झालेल्या मतदान केंद्रांवर अधिक बंदोबस्त नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये विशेष शाखेच्या निवडणूक कक्षासह दोन्ही परिमंडळ व गुन्हे शाखांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यामध्ये उपायुक्त मोनिका राऊत व किशोर काळे यांनी परिमंडळ एक व दोनमधील केंद्रांची पाहणी केली. गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी मतदान केंद्रांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला. सर्व सहायक आयुक्त व पोलिस निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने त्यासंदर्भातील नोंदी आयुक्तालयाकडे सादर केल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांची सुरक्षा, बंदोबस्त याचा आढावा पूर्ण झाला आहे. सन २०१९ व २०२४ मधील निवडणुकीत गोंधळ झालेल्या ठिकाणी सुरक्षेचा विशेष आढावा घेण्यात आला.