एसटीचा ताफा अद्ययावत

महाराष्ट्र टाइम्स

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा बदल घडवत आहे. लवकरच एसटीच्या ताफ्यात आठ हजार ३०० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. यामध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्वो आणि मिनी बसचा समावेश आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत या सर्व गाड्या सेवेत येतील. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत एसटीची सेवा अधिक सक्षम होणार आहे.

एसटीचा ताफा अद्ययावत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने बसगाड्यांचा ताफा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आठ हजार ३०० नव्या बसगाड्यांची भर पडणार आहे. नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्वो (आसनी आणि शयनयान), मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२६अखेर या गाड्या सेवेत आणण्याचे महामंडळाचे नियोजन आहे.

बसगाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे आयुर्मान पूर्ण झालेल्या किंवा नादुरुस्त गाड्या तात्पुरत्या दुरुस्त करून चालवण्याची नामुष्की महामंडळावर आली आहे. दिवाळीतील सणासुदीच्या हंगामात एसटीच्या नादुरुस्त गाड्या चर्चेचा विषय होता. अनेक ठिकाणी गाड्या विलंबाने पोहोचत असल्याने प्रवाशांना वाहतुकीचे अन्य पर्याय शोधावे लागतात. एसटीच्या १४ हजार गाड्यांपैकी सध्या १२ हजार ५०० गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत.

एसटीची प्रवासीसेवा विस्तारण्यासाठी ग्रामीण भाग, महानगरे, पर्यटनस्थळे येथे लक्ष्य केंद्रीत करून प्रवासीगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण आणि तालुकास्तरासाठी तीन हजार साध्या बसगाड्यांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साध्या बसगाड्यांमध्ये तीन बाय दोन आसनक्षमता असणार आहे. यामुळे आसनक्षमतेत वाढ होणार आहे. नव्या वर्षात बसगाड्यांची चाचणी अपेक्षित आहे. मार्च २०२६पासून या बसगाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होतील.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून जिल्हे आणि तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गांवर स्मार्ट बस धावत्या करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. यासाठी पाच हजार बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.