Shocking Incidents Of Robbery On The Samruddhi Highway At Night
‘समृद्धी’वर मध्यरात्रीपुन्हा लुटीची मालिका
Contributed by: सिन्नर|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
समृद्धी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यात लूटमारीच्या सलग घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेडचे कार व्यावसायिक मोहम्मद फरहान आणि छत्रपती संभाजीनगरचे ॲड. श्रीकांत मिश्रा यांना शुक्रवारी लुटल्यानंतर शनिवारी पुन्हा हिंगोलीतील कारला दरोडेखोरांनी लुटले. ही कार गंभीर रुग्णाला मुंबईला उपचारासाठी घेऊन जात होती.
हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील पांडुरंग माने हे अपघातात जखमी अर्जुन खरात यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात नेत होते. कारमध्ये खरात यांची आई, भाऊ आणि चालक किरण खंदारे होते. दुसंगवाडी-मलढोण शिवारात मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता दरोडेखोरांनी रस्त्यावर टणक वस्तू फेकली. कार त्या वस्तूवरून गेल्यानंतर इंजिनचे चेंबर फुटले आणि तेल गळू लागले.कार थांबताच १० ते १२ दरोडेखोरांनी चालकासह माने यांना मारहाण करीत ४५,५०० रुपये, सोन्याची अंगठी लुटली.
‘समृद्धी’वर सहा दिवस ब्लॉक
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही (६ मीटर उंचीची आडवी कमान) उभारणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान सहा दिवस सिन्नर-भरवीर आणि भरवीर-इगतपुरी मार्गावर ठरावीक वेळेत ४५ ते ६० मिनिटे वाहतूक थांबविण्यात येणार आहे.