Onion Worth Crores Has Rotted Questions Raised On Governments Wasteful Spending
कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
निफाड : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची मोहीम हाती घेतली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेला कांदा सडल्याचे धक्कादायक वास्तव लासलगाव येथे समोर आले आहे. मनमाड रस्त्यावरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर कांदा सडला असून, किडे-अळ्या लागलेल्या कांद्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या कांद्यातून काळपट, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने बफर स्टॉकला बफर शॉक बसल्याचे चित्र आहे.
या मोहिमेत साडेतीन महिन्यांत सुमारे एक लाख २० हजार टन कांद्याची १,२३५ ते २,३४५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये हा कांदा साठवण्यात आला आहे. यापूर्वी चांदवड येथील गोदामातील निकृष्ट व सडलेल्या कांद्याचा प्रश्न समोर आला होता.