कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला!

Contributed byनिफाड|महाराष्ट्र टाइम्स
कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची मोहीम हाती घेतली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेला कांदा सडल्याचे धक्कादायक वास्तव लासलगाव येथे समोर आले आहे. मनमाड रोडवरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर कांदा सडला असून, किडे-अळ्या लागलेल्या कांद्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या कांद्यातून काळपट, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने बफर स्टॉकला बफर शॉक बसल्याचे चित्र आहे.

या मोहिमेत साडेतीन महिन्यांत सुमारे एक लाख २० हजार टन कांद्याची १,२३५ ते २,३४५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये हा कांदा साठवण्यात आला आहे. यापूर्वी चांदवड येथील गोदामातील निकृष्ट व सडलेल्या कांद्याचा प्रश्न समोर आला होता.
मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न

दिल्लीसह प्रमुख महानगरांत कांद्याचे किरकोळ दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, कोलकाता आणि कोची येथे पाठवण्यात येत आहे. मात्र, सडलेल्या कांद्याची प्रतवारी करून चांगला कांदा वेगळा करण्याचे काम मजुरांना दुर्गंधीयुक्त वातावरणात करावे लागत आहे. कांद्याची हाताळणी करताना मास्क, हातमोजे यांसारखी सुरक्षा साधने नसल्याने मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कांदा चेन्नईला...२

सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा गोदामातच सडत असेल, तर साठवणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. कांदा किती प्रमाणात खराब झाला, साठवणुकीत कोणती खबरदारी घेण्यात आली आणि सरकारचे किती आर्थिक नुकसान झाले, याची तातडीने चौकशी करून दोषी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.