Artificial Intelligence Used To Create Fake Railway Tickets Under Scrutiny In Ticket Checking Process
एआयच्या मदतीने बनवले रेल्वे तिकीट
महाराष्ट्र टाइम्स•
बनावट डिजिटल तिकीट किंवा पास तयार करण्याचा हा एकमेव प्रकार नाही. मध्य रेल्वेसोबतच पश्चिम रेल्वेवरही अशा पद्धतीने बनावट पास वापरल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पश्चिम रेल्वेतील तिकीट परीक्षकांनीही अशा प्रकरणांत अनेक प्रवाशांना पकडले आहे. एआयची सहज उपलब्ध साधने वापरून अधिकृत तिकीट किंवा पासची हुबेहूब नक्कल तयार करणे सोपे होत असल्याने रेल्वे प्रशासनासमोर डिजिटल तिकीट पडताळणी अधिक सक्षम करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्याचे प्रकार वाढत असतानाच आता रेल्वेच्या तिकीट व्यवस्थेलाही त्याचा फटका बसू लागला आहे. एआयच्या मदतीने यूटीएस ॲपवरील ऑनलाइन तिकिटासारखे दिसणारे बनावट तिकीट तयार करून प्रवास करणाऱ्या तरुणीसह तिघांना मध्य रेल्वेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट निरीक्षक हेमंत काळे हे सहकाऱ्यांसह गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासत होते. यावेळी त्यांनी दोन तरुण आणि एका तरुणीकडे तिकिटांची मागणी केली. तिघांनी मोबाइलमधील ‘माय फाइल’च्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह केलेले यूटीएसवरील ऑनलाइन तिकीट दाखवले. मात्र, तिघांच्या तिकिटांवर एकच यूटीएस क्रमांक असल्याचे काळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तिघांना यूटीएस ॲपमध्ये तिकीट दाखवण्यास सांगितले. परंतु, तिघांनाही ॲपवर तिकीट दाखवता आले नाही. त्यानंतर केलेल्या पडताळणीत त्यांनी दाखवलेले तिकीट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एआयच्या मदतीने मूळ यूटीएस तिकिटासारखे दिसणारे बनावट तिकीट तयार केल्याचे समोर आले.