पाटील दाम्पत्याची ‘हायरॉक्स’ स्पर्धेत बाजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पाटील दाम्पत्याची ‘हायरॉक्स’ स्पर्धेत बाजी
नागपूर : मध्य रेल्वेत वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत कृष्णात पाटील आणि लेप्रसी ट्रेनिंग सेंटर येथे सहायक आरोग्य सेवा संचालक म्हणून कार्यरत डॉ. दीपिका पाटील या दाम्पत्याने मुंबईत पार पडलेली ‘हायरॉक्स मिक्स्ड डबल्स चॅलेंज’ स्पर्धा २ तास १५ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली. मध्य रेल्वेतून या प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन ती पूर्ण करणारे पहिले दाम्पत्य म्हणून त्यांच्या कामगिरीचे विशेष महत्त्व आहे. ‘हायरॉक्स’ ही धावणे आणि विविध कार्यात्मक व्यायामांचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिटनेस स्पर्धा आहे. या स्पर्धेत ८ किलोमीटर धावण्यासह आठ विविध व्यायाम केंद्रांवरील आव्हाने पूर्ण करावी लागतात. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही पाटील दाम्पत्याने फिटनेसला प्राधान्य देत या आव्हानात्मक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्या कामगिरीतून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश मिळत असून कौतुक होत आहे.