पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला कामांचा आढावा
११ प्रेक्षागृहांचे काम ४४ टक्के
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या ‘नागपूर स्पोर्ट्स हब’च्या कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. हा प्रकल्प नागपूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजनातून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.‘नागपूर स्पोर्ट्स हब’सह विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांच्या अद्ययावतीकरणाचा आढावा घेण्यात आला.
या वेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त राजेश खवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी शशीकांत कळंबे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सुनीता रावते तसेच वास्तुविशारद ट्रान्सस्टेडियाचे संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
संकुल परिसरात कोराडीच्या धर्तीवर उच्च दर्जाचे पथदिवे लावावेत. तसेच सौरऊर्जा प्रणालीचा सर्वत्र वापर करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या. बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
११ प्रेक्षागृहांचे काम ४४ टक्के
‘नागपूर स्पोर्ट्स हब’अंतर्गत नव्याने उभारण्यात येणाऱ्या ११ प्रेक्षागृहांच्या कामाची सरासरी प्रगती ४४ टक्के झाली आहे. यामध्ये स्पोर्ट्स कॅफेटेरियाचे काम सर्वाधिक, म्हणजे ८० टक्के पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑलिंपिक स्तरीय जलतरण तलाव उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या आराखड्यात पर्यावरणपूरक बदल करण्यात आले असून, परिसरातील जुनी झाडे वाचवण्यासाठी इमारतींच्या नियोजनात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
सुधारित प्रस्तावाला मंजुरी
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, सोलर सिस्टीम आणि ‘ग्रीहा’ प्रमाणीकरणाच्या निकषांमुळे प्रकल्पाची सुधारित किंमत ११४४.३६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बैठकीत मानकापूर येथील जुन्या इनडोअर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोअरिंग, वातानुकूलन व अग्निशामक यंत्रणा, तसेच ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि पॅव्हेलियन इमारतीच्या अद्ययावतीकरणासाठी ९१.८८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय राज्य शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत संकुलात सुरू असलेल्या विभागीय निपुणता केंद्र आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटरला कार्योत्तर मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. बॅडमिंटन खेळाचे राज्यस्तरीय उच्चस्तर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. संकुल परिसरातील ‘युवा वसतिगृह’ आवश्यक सुविधा उपलब्ध करून लवकरच युवकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.