सक्करदरा पोलिसांनी मोठा ताजबाग परिसरात सापळा रचून गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तेलंगणातील दोन विद्यार्थ्यांना अटक केली. रागल्ला भुवन रागल्ला राजेशम (वय २१) आणि निम्मा विजय श्रीनिवास (वय २०, दोघेही रा. वेंगलाईपेठ, करीमनगर), अशी अटकेतील विद्यार्थ्यांची नावे आहेत. भुवन हा हॉटेल मॅनेजमेंटचे, तर निम्मा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
शुक्रवारी सायंकाळी दोन युवक मोठा ताजबाग परिसरात गांजा विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. साहाय्यक पोलिस आयुक्त महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक चेनतसिंग राजपूत, प्रकाश सिडाम, शैलेश बेदोडकर, हेडकॉन्स्टेबल धर्मेंद्र नितनवरे, रसिका घायवट आणि ज्ञानेश्वर बांते यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.त्यांच्याकडून मोबाइल, एक किलो ३०० ग्रॅम गांजा असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरहानभाई नावाच्या व्यक्तीने दोघांना गांजा विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.