‘जीडीपी ३८ लाख कोटी डॉलरवर पोचेल’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘जीडीपी ३८ लाख कोटी डॉलरवर पोचेल’
रुरकी : ‘भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सध्याच्या ४.०१५ हजार अब्ज डॉलरवरून पुढील २० वर्षांत ३८ लाख कोटी डॉलरपर्यंत वाढेल,’ असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला.

‘आयआयटी, रुरकी’च्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डोवाल म्हणाले, ‘विद्यार्थी एका अत्यंत परिवर्तनीय युगात जगत असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.’ या वेळी त्यांनी प्रभू श्रीरामांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना जीवनात धाडसी बनण्याचे आवाहन केले. ‘महर्षी विश्वामित्रांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रभू श्रीरामांची निवड त्यांच्या अफाट धैर्यामुळेच केली होती,’ असे ते म्हणाले.
सिक्कीम येथे सेवेदरम्यान एका शेर्पाकडून शिकलेली यशाची तीन महत्त्वाची सूत्रेही डोवाल यांनी सांगितली. ‘पहिले सूत्र म्हणजे आपण नकाशावर नेमके कुठे उभे आहोत हे ओळखणे; दुसरे, आपल्याला कुठे जायचे आहे हे ठाऊक असणे; आणि तिसरे म्हणजे तिथे पोहोचण्याचा व परतण्याचा मार्ग माहीत असणे,’ असे ते म्हणाले.