नागपूर : गोळीबार चौक ते मारवाडी चौक तसेच गांधीबाग कापड मार्केट परिसरात मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर शहर वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. मोठ्या वाहनांचे रस्त्यालगत पार्किंग, तसेच माल चढविणे-उतरणे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी वेळ निश्चित करावी, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, नियमित वाहतूक नियंत्रण करावे आणि गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील, आशिष खुबळकर, भारत ठाकरे, कुलवंतसिंग भामरा, तुषार फुले, अमरसिंग राजपूत आदी उपस्थित होते.