विद्यापीठात रोजगार महाकुंभ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विद्यापीठात रोजगार महाकुंभ
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार महाकुंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांत होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न नागपूर, भंडारा, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ५०हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यात २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून नागपूर विद्यापीठाच्यावतीनेदेखील विविध ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या मेळाव्यांत विविध उद्योग, उद्योगसमूह, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच विविध आस्थापना सहभागी होणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात २५ ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. नागपूर शहरासह विविध तालुक्यांच्या ठिकाणीही मेळावे आयोजित केले जातील. यासाठी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यात १२, भंडारा जिल्ह्यात आठ, तर गोंदिया जिल्ह्यात नऊ ठिकाणी एकाच दिवशी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे कार्यक्रम होतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कंपन्या, आस्थापना तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांना पूर्वनोंदणी करावी लागणार आहे. यासाठी नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याबाबत सर्व महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. ज्या केंद्रांवर रोजगार मेळावे होणार आहेत, त्या केंद्रांची नावे, पत्ते आणि संपर्क क्रमांक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. एकाच दिवशी विविध ठिकाणी होणाऱ्या या रोजगार मेळाव्यांमुळे अनेक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.