बनावट दागिन्यांद्वारे ‘मुथूट’ला गंडा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times
बनावट दागिने तारण ठेवून खामल्यातील मुथूट फिनकॉर्पला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नयन नरसिंग जंजारला (वय ३०, मूळ रा. रामपूर, चंद्रपूर; सध्या रा. साईनगर, जयताळा) आणि विजय दत्तुजी कुर्वे (वय ५७, रा. शांतीनगर कॉलनी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शाखा व्यवस्थापक सचिन निशिकांत चापरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, मे २०२५मध्ये नयन याने ९.९ ग्रॅमची सोन्याची अंगठी तारण ठेवून ६३ हजार ५२५ रुपयांचे कर्ज घेतले. विजय कुर्वे याने ७१.४ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून तीन लाख ५० हजार २५० रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर दोघांनीही परतफेड केली नाही. ऑडिटदरम्यान त्यांनी तारण ठेवलेले दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चापरे यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.