शहरात जिवंत स्फोटके आढळल्याने खळबळ

महाराष्ट्र टाइम्स
शहरात जिवंत स्फोटके आढळल्याने खळबळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जिवंत डिटोनेटर घेऊन फिरणाऱ्या युवकाला लकडगंज पोलिसांनी आजमशाह चौक परिसरातून अटक केली. राजेंद्र रामलाल विश्वकर्मा, वय ३५, मूळ रा. बालोद, छत्तीसगड, असे आरोपीचे नाव आहे. तो वरोरा येथील वेकोलि खाणीत श्रमिक म्हणून काम करतो.

मंगळवारी राजेंद्र रेल्वेने नागपुरात आला. आजमशाह चौक परिसरात तो चोरीचे मोबाइल आणि डिटोनेटर विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. झडतीत त्याच्याकडून तीन चोरीचे मोबाइल, दोन जिवंत डिटोनेटर आणि १२ मीटर लीड वायर जप्त करण्यात आली. या घटनेने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. पोलिसांनी एटीएस, गुप्तचर यंत्रणा आणि पेसोच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. राजेंद्र डिटोनेटर कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजेंद्रने वेतन न मिळाल्याच्या रागातून कंत्राटदाराचे तीन मोबाइल आणि खाणीतून दोन डिटोनेटर चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. या दाव्याची खातरजमा करण्यासाठी लकडगंज पोलिसांचे पथक वरोऱ्याला जाणार आहे.