भाजपची दहीहंडी स्पर्धा शनिवारी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
dahi handi competition and msme conference mega event in nagpur
नागपूर : भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूरतर्फे प्रभाग ३२मध्ये शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शारदा चौक, जुना सुभेदार येथे सायंकाळी ६ वाजता ही स्पर्धा होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरुष गटासाठी ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये, तर महिला गटासाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यावेळी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धाही होणार असून ती दुपारी ३ वाजता सुरू होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व महापालिकेच्या अग्निशमन व विद्युत समितीच्या सभापती रूपाली ठाकूर आणि परशू ठाकूर यांनी केले आहे.

राष्ट्रीय एमएसएमई परिषद शनिवारी
नागपूर : राष्ट्रीय उद्योग भारततर्फे एकदिवसीय राष्ट्रीय एमएसएमई परिषदेचे आयोजन येत्या शनिवारी मंगलमूर्ती चौक येथील अनसूया मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होईल. या परिषदेत उद्योजक, स्टार्टअप फाउंडर, एमबीए, इंजिनीअरिंग तसेच इतर शाखांतील विद्यार्थी असे सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय उद्योग भारतचे राष्ट्रीय महामंत्री सुनील कुमार मांडवे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संघटक व सल्लागार ज्ञानेश्वर टाकले उपस्थित होते.

सेवासदनचा

सोहळा उद्या

नागपूर : सेवासदन शिक्षण संस्थेतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता भानुताई गडकरी सभागृहात होणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रमुख वक्त्या असतील. अध्यक्षस्थानी कुमार काळे राहतील. कांचन गडकरी व वासंती भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.