Gunfire At Councilors House Assailants Still Not Found
गोळीबार करणारे कुठे लपून बसले?
महाराष्ट्र टाइम्स•
प्रभाग २६चे काँग्रेस नगरसेवक शुभम शेषरावजी मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर आठ दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे मोटघरे कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहर पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
२५ ऑगस्टला मध्यरात्री १२.४० वाजताच्या सुमारास मोपेडवरून तोंडाला कापड बांधलेले दोन युवक मोटघरे यांच्या श्रावणनगर, स्वामी नारायण मंदिरामागील घराजवळ आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून घराच्या गॅलरीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी काच फोडून आरपार गेली. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून मोटघरे बाहेर आले. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने भांडेवाडी पोलिसांना कळविले. नगरसेवकाच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच मोटघरे घरात गेले होते. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. जुलै महिन्यात मध्य प्रदेशात त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवरही पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत २०पेक्षा अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, हल्लेखोर अद्याप गवसलेले नाहीत. दरम्यान, खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धनगौरी बाबा मंदिराजवळ जुलै महिन्यात सराफा मंगेश मारोतकर यांच्यावरही गोळीबार करून लूट करण्यात आली होती. मोटारसायकलवर आलेल्या दोन लुटारूंपैकी एकाने मारोतकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. लुटारूंनी त्यांच्याकडील चांदी व सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपये रोख असा एकूण १२ लाख रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. या घटनेला दीड महिना उलटूनही लुटारू पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार आणि सराफा लूट या दोन्ही घटनांतील आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.