New Facility To Get Gas In Just One And A Half Hours
अवघ्या दीड तासात घरपोच मिळणार गॅस
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
घरगुती ग्राहकांच्या सोयीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘एचपी नव्या’ हा १० किलो वजनाचा कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडर बाजारात आणला आहे. पारंपरिक १४.२ किलोच्या लोखंडी सिलिंडरला हा हलका आणि सोयीस्कर पर्याय ठरणार आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर अवघ्या दीड तासात या सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे.
सध्या नागपूरमधील नऊ एचपी गॅस वितरकांकडे ‘एचपी नव्या’चा स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी या सिलिंडरच्या रिफिलिंगवर कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. फायबर/कॉम्पोझिट मटेरियलपासून तयार करण्यात आलेल्या या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे ग्राहकांना बाहेरून सहज पाहता येते. त्यामुळे गॅस कधी संपणार, याचा अंदाज आधीच घेता येतो.पारंपरिक लोखंडी सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर वजनाने हलका असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तो हलवणे किंवा उचलणे सोपे जाते. अत्यंत कमी कागदपत्रांवर हा सिलिंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे. एलपीजी डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष बबलू तिवारी यांनी सांगितले, “कॉम्पोझिट सिलिंडर वजनाने हलका असून बुकिंगनंतर तात्काळ घरपोच मिळतो. यासाठी ग्राहकांना नवीन कनेक्शन घेण्याची गरज नाही. अत्यंत कमी कागदपत्रांसह तो दिला जातो. रिफिलिंगवरही कोणतेही निर्बंध नाहीत.”
या १० किलो सिलिंडरची किंमत १ हजार ७२५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. नियमित १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरपेक्षा यात ४.२ किलो गॅस कमी असला तरी त्याची किंमत नियमित सिलिंडरपेक्षा सुमारे ७०० रुपयांनी जास्त आहे. या सुविधेमुळे अवैध किंवा बेकायदेशीर मार्गाने होणाऱ्या गॅस सिलिंडर विक्रीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.