The Celebration Of Simplicity In Ganesh Festival And The Spirit Of Social Unity
साधेपणाचा ‘सोहळा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मूर्ती आणि देखावे यांचे खास आकर्षण असते. चौफेर विस्तारलेल्या मुंबईत विविध ठिकाणी त्याची प्रचीती येते. गोरेगाव, बोरिवली भागातील गणेशोत्सवाचा आढावा घेतल्यानंतर हे प्रकर्षाने अधोरेखित होते.
गोरेगावच्या नागरी निवारा परिषदेच्या परिसरात विविध इमारतींमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागरी निवारा परिषदेची स्थापना झाली तेव्हा नागरिकांनी सामाजिक एकोप्याच्या जाणिवेतून इमारतींमध्ये गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. नागरी निवारा परिषदेच्या इमारतींसोबतच परिसरातील म्हाडाच्या इमारतींमध्येही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे परिसरातील विविध इमारतींमध्ये रोषणाईचा झगमगाट झालेला दिसतो.या परिसरातील सातपुडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १५व्या वर्षात पदार्पण केले असून सात दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोककला पुढच्या पिढीला कळाव्यात यासाठी या मंडळाच्या माध्यमातून जागरण, गोंधळाचेही आयोजन करण्यात आले होते. या मंडळाने यंदा राजाच्या दरबाराचा देखावा तयार केला असून या मूर्तीची प्रभावळ तुळजाभवानीची आहे. त्यामुळेच जागरण, गोंधळ पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे या मंडळाचे पदाधिकारी अविनाश साळवी यांनी सांगतिले. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांपर्यंत महाराष्ट्राची परंपरा पोहोचवण्याचा हाच प्रयत्न नागरी निवारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही केला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत ‘नागरी निवाराचा महाराजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तीचे रूप खंडोबाचे होते. या मंडळातही देखाव्याचा फारसा भपका नव्हता. त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे लक्ष थेट मूर्तीवरच केंद्रीत होत होते.
बोरिवलीमधील मराठीपण जपणाऱ्या मंडळांमध्येही देखाव्याचा फारसा बडेजाव दिसत नाही. साधा देखावा, प्रसन्न मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील भाविक या मंडळांना आवर्जून भेट देतात. बोरिवली पूर्व येथील मागाठाणेमधील उपनगराचा राजा या मंडळाची मूर्ती हेच या मंडळाचे प्रमुख आकर्षण असते. हे या मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. ही मूर्ती २५ फुटी असून ही मूर्ती प्रत्यक्ष मंडपामध्येच साकारली जाते. ही मूर्ती कायमच सिंहासनावर आरुढ असते. मूर्तीव्यतिरक्त मंडळातर्फे देखाव्यावर पैसे खर्च न करता हे पैसे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरले जातात, असे कार्यकारी सदस्य स्वप्नील जाधव यांनी सांगितले. या मंडळामध्ये १० दिवसांमध्ये हजारो लोक येतात. शहरांमधील उंच मूर्तींच्या तोडीस तोड अशी ही मूर्ती या भाविकांसाठी महत्त्वाची असते. मागाठाण्याच्या या मंडळाकडे जाणारा रस्ताही आता रुंद झाला असून या रस्त्यावर देखणी रोषणाईही करण्यात आली आहे.