मुंबई : अंधेरी पूर्वेतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पारसीवाडा यंदा ६३वा गणेशोत्सव साजरा करत आहे. सहा दशकांहून अधिक काळ उत्सवाची परंपरा जपताना, मंडळाने भक्तीसोबतच आपल्या सांस्कृतिक मुळांनाही घट्ट धरून ठेवले आहे. त्यामुळे ‘पारसीवाडाचा महाराजा’ म्हणजे आकर्षक आरास आणि गणरायाचे दर्शन यासोबतच पारंपरिक कला, संगीत आणि संस्कृतीचा उत्सव अशीच ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या गणेश मंडपात एखाद्या प्रसिद्ध धार्मिक स्थळाची प्रतिकृती साकारली जाते, हे या मंडळाचे वैशिष्ट्य.
अनेकांना देशातील विविध धार्मिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा असते; मात्र प्रत्येकालाच ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे अशा भाविकांना मुंबईतच त्या धार्मिक स्थळाचे दर्शन घेता यावे, या भावनेतून मंडळाने ही परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा मंडळाने कृष्ण नगरी साकारली आहे. यामध्ये कृष्णाच्या जन्मापासून पुढील आयुष्यातील टप्पे मांडण्यात आले आहेत. यापूर्वी मंडळातर्फे अक्कलकोट, वैष्णोदेवी मंदिरासह शिवराज्याभिषेक सोहळ्यासारख्या ऐतिहासिक विषयांवरील देखावे साकारण्यात आले आहेत. दरवर्षी वेगळा विषय निवडून त्याची प्रतिकृती उभारल्यामुळे मंडपात येणाऱ्या भाविकांना गणरायाच्या दर्शनासोबतच काहीतरी वेगळे पाहण्याची संधी मिळते. ‘अनेकांना ही धार्मिक स्थळे प्रत्यक्ष पाहता येत नाहीत. त्यामुळे आमच्या माध्यमातून त्यांना मुंबईतच त्या स्थळाचे दर्शन घेता यावे, या भावनेतून आम्ही दरवर्षी अशा प्रतिकृती साकारतो. हे देखावे लोकांनाही फार आवडतात,’ असे मंडळाचे खजिनदार संदीप आंबेरकर यांनी सांगितले. सजावटीच्या क्षेत्रातही श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पारसीवाडा यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अध्यक्ष संदीप दळवी आणि खजिनदार आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची ६३ वर्षांची वाटचाल आजही भक्ती, परंपरा, कला व संस्कृतीची सांगड घालत सुरू आहे.