The Significance Of Ganesh Festival The Essence Of Simple Melodies And Devotion
सूर निरागस हो...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘एकदंताय वक्रतुंडाय’चा मंत्रमय स्वर असो, ‘सूर निरागस हो’मधून उमटणारा भक्तिभाव असो, ‘गजानना गजानना’चा जोश असो किंवा ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मोरया रे’सारख्या गाण्यांतून जाणवणारी गणेशोत्सवाची ऊर्जा किंवा 'गणेश तांडव' स्तोत्रं असो... गणराय माझ्या गाण्यांत वेगवेगळ्या रूपांनी आला आहे. कधी स्तोत्रांतून, कधी आरतीतून, कधी मंत्रातून, तर कधी गाण्यांच्या सुरांतून... माझ्या आवाजातून गणेशाची ही विविध रूपं श्रोत्यांपर्यंत पोहोचली, ही माझ्यासाठी केवळ कलाकार म्हणून समाधानाची गोष्ट नाही तर, हा गणरायाचा मला आशीर्वाद आहे. मी फक्त त्यासाठी एक माध्यम आहे. कलेचा, संगीताचा आशीर्वाद मिळाला आणि त्या संगीताच्या माध्यमातून श्रीगणेशाचं नाव घेता आलं, श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आलं, यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी दुसरं काय असणार?
माझ्यासाठी गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही. आमच्या घरी गणपतीचे ते दहा दिवस म्हणजे अक्षरशः लग्नापेक्षाही मोठं उत्साहाचं वातावरण असतं. कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. घरात सतत माणसांची ये-जा, गप्पा, संगीत, हशा आणि प्रसन्न वातावरण असतं. मला नेहमी वाटतं, या दहा दिवसांत आमच्या भावनांची जी बॅटरी चार्ज होते, ती पुढचं पूर्ण वर्ष आम्हाला ऊर्जा देत राहते. या उत्सवात संगीतसेवेचा एक खास भाग आहे, ती म्हणजे आमच्या घरी होणारी रात्रभराची मैफल. या परंपरेला जवळपास तीस वर्षं झाली. सुरुवात झाली तेव्हा मी चेंबूरमधल्या शंभर स्क्वेअर फुटांच्या छोट्याशा घरात राहायचो. तिथे फजल कुरेशी, दुर्गा जसराज, रतन मोहन शर्मा असे कितीतरी दिग्गज कलाकार यायचे. बसायला तर सोडाच, उभं राहायलाही जागा नसायची. तरी रात्रभर मैफल रंगायची. आज घर थोडं मोठं झालं आहे; पण परिस्थिती फारशी बदललेली नाही. आजही जागा कमी पडते. कलाकार स्वतःहून येतात आणि सेवा म्हणून गातात. कुणी दोन गाणी, कुणी पाच गाणी आणि एका रात्री कर्नाटक संगीतापासून हिंदुस्थानी संगीत, गझल, भजन, अभंग, जॅझ, फोक, रॉकपर्यंत सगळं ऐकायला मिळतं. हीच तर गणेशोत्सवाची खरी श्रीमंती आहे. माझ्या कार्यक्रमाची सुरुवातही गणेशाच्या गाण्यानेच होते. त्यावेळी रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांत दिसणारा भाव माझ्यासाठी खूप मोठा असतो. समोर कोणी मोठा दिग्दर्शक असो, उद्योजक असो किंवा एखादा साधा माणूस, गणपतीचं गाणं सुरू झालं की त्यांच्या डोळ्यांत एक कृतज्ञता दिसते. जणू ते डोळे मला ‘धन्यवाद’ म्हणत असतात.भक्तिगीत गाताना माझ्यासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे सूर निरागस असायला हवा. तुम्ही तुमचं संगीताचं ज्ञान, कौशल्य दाखवण्याचा अट्टहास केला, तर भक्तीभाव हरवतो. मनातला भाव जर स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तर तो आवाजातून आपोआप श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. ‘सूर निरागस हो’ हे गाणं त्याचं सुंदर उदाहरण आहे. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील या गाण्याची आठवण सांगताना मला आजही गंमत वाटते. गीतकार स्वानंद किरकिरे हे गाणं लिहिणार होते, पण काही कारणांमुळे त्यांना ते पूर्ण लिहिता आलं नाही. मात्र त्यांनी 'सूर निरागस हो’ हे शब्द दिले. ते शब्द इतके ताकदीचे होते की, त्यांच्याभोवतीच सगळं गाणं उभं राहिलं. पुढे गीतकार मंगेश कांगणे याने तितकेच उत्तम शब्द लिहिले. ते शब्द वाचले आणि माझ्या अंतर्मनातून चाल एका झटक्यात बांधली गेली. मुखडा तयार झाला आणि सगळं अगदी सहज घडत गेलं. दिग्दर्शक सुबोध भावे याने गाण्यामध्ये नंद रागाचा वापर करण्याची कल्पना सुचवली. मग अंतर् यात नंदचा रंग आणला आणि पुन्हा मूळ चालीशी तो जोडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाण्याचं रेकॉर्डिंगही एका टेकमध्ये झालं. काही गाणी आपण खूप विचार करून, अनेक टेक घेऊन घडवतो. पण काही वेळा एखादा सूर मनातून इतका सहज बाहेर येतो की, त्यावर पुन्हा मेहनत घ्यावी लागत नाही. ‘सूर निरागस हो’ माझ्यासाठी असंच आहे. त्याची चाल एका झटक्यात आली आणि ते गाणंही एका टेकमध्ये रेकॉर्ड झालं.
आत्तापर्यंत गणरायानं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप, खूप जास्त दिलं आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे स्वतःसाठी काही मागावंसं वाटत नाही. यंदा एकच मागणं आहे की, सगळ्यांना आनंद, शांती आणि मनःशांती मिळू दे. कारण मन शांत नसेल तर आपण कोणतंही काम मनापासून करू शकत नाही. यंदा माझी एक वैयक्तिक प्रार्थनाही आहे. माझ्या आईची तब्येत थोडीशी नाजूक आहे. त्यामुळे गणेशाच्या चरणी तिच्यासाठीही मनापासून प्रार्थना करणार आहे. गणरायाचं नाव घेण्यासाठी मला वेगळी साधना करावी लागत नाही. माझ्या कलेतून त्याचं नाव घेण्याची संधी तोच मला देतो. माझ्यासाठी हा आशीर्वादच पुरेसा आहे. गणरायाच्या चरणी माझा सूर असाच निरागस राहू दे...