आत्म्याशी नाते जोडतो!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आत्म्याशी नाते जोडतो!
गणपतीच्या माझ्या सर्व आठवणी रमेशच्या, म्हणजे माझे पती अभिनेता रमेश भाटकर यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या आहेत. वास्तविक मी धार्मिक नाही, परंतु भाटकर मंडळी परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारी व उत्सवप्रिय. आमचा मुलगा हर्षवर्धन हा गणेशोत्सव ातच जन्मला. त्यानंतर काही वर्षांनी आम्ही पुण्यात घरगुती गणेशोत्सव सुरू केला. माझे सासरे संगीतकार स्नेहल भाटकर, सासूबाई लीला भाटकर, दीर अविनाश, जाऊ अंजली हेही गणेशभक्त असल्याने गणेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत व्हायचे. सात दिवसांचा गणेशोत्सव खूप आनंदात साजरा व्हायचा. आम्ही पुण्याहून मुंबईला चर्चगेट येथील ‘यशोधन’ इमारतीत रहायला आल्यानंतर गणेशोत्सव येथे साजरा करू लागलो. त्यानंतर १६ वर्षांनी आम्ही मलबार हिल येथे स्थलांतरित झालो, तिथेही ही परंपरा सुरू ठेवली.

उत्सवात अण्णांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा कधी-कधी गाण्याचा सुंदर कार्यक्रम व्हायचा. सात दिवस नातेवाईक, मित्रमंडळी, कलाकार, अनेक न्यायमूर्ती व कर्मचारी असे जवळपास दोनशे-सव्वादोनशे मंडळींच्या भेटी-गाठी होत. सर्वांसाठी रोज वेगळा, दोन तिखट व एक गोड पदार्थ आणि शेवटी मसाला दूध असा मेन्यू असायचा. न्यायमूर्ती अमजद सय्यद, न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांना रगडा पॅटिस तर न्यायमूर्ती रोशन दळवी यांना मसाला दूध आवडत असे. ‘यशोधन’मध्ये आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांच्या छोट्या मुलाला आमच्या घरच्या ओल्या नारळाच्या करंज्या खूप आवडत. त्यामुळे त्याच्यासाठी मी मुद्दाम काढून ठेवत असे.
घरच्या गणपतीसाठी रमेश मनापासून आरास करायचा. दरवर्षी वेगवेगळे विषय निवडायचा. मुंबई उच्च न्यायालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने त्याने, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, यांची प्रतिकृती उभारली होती. तर, कोकणातील भाटे गावात घर बांधायचे ठरले तेव्हा, तशा घराची आरास साकारली. गणपतीचा दिवस जवळ आला की, रमेश काय करावे, या विचारात असायचा आणि मग सगळा पसारा करून रात्रभर जागत, मदतनीस गणेशच्या मदतीने आरास सजवायचा.

आमच्या उत्सवात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, रमाकांत देसाई, अंशुमन गायकवाड तसेच अलका कुबल, रीमा लागू, आशालता वाबगावकर, वर्षा उसगांवकर, मृणाल कुलकर्णी, विजू खोटे, भरत दाभोळकर, जयंत वाडकर, विनय येडेकर असे अनेक कलाकार मंडळीही गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत. घरगुती गणेशोत्सवातील सात दिवसांत इतकी धांदल असूनही मी एकही दिवस न्यायालयाचे कामकाज चुकवत नसे. कारण न्यायालयातील वादी व प्रतिवादी हेच माझा गणपती असत आणि केलेले काम हीच माझी आरती!

गेली सात वर्षे बाबा (रमेश) गेल्यानंतर त्याची आठवण म्हणून माझ्या घरचेच असणारे गणेश व वैशाली हांडे यांच्या मदतीने मी दीड दिवसाचा गणपती बसवते. समईच्या शांत प्रकाशातला गणपती; स्थिर बुद्धी, नीतीमत्ता व कर्तव्याचे प्रतीक असलेला गणपती, आत्म्याशी माझे नाते जोडतो.

(शब्दांकन : रमेश खोकराळे)