पर्यावरणरक्षण, शैक्षणिक  मदतीचा निरंतर संकल्प

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पर्यावरणरक्षण, शैक्षणिक  मदतीचा निरंतर संकल्प
सत्तरच्या दशकात ठाणे विस्तारू लागले आणि वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, किसननगर या वसाहतींमधून कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांनी चाळींमध्ये घरे घेतली. याचकाळात ठिकठिकाणी मित्र मंडळांची स्थापना होऊन सार्वजनिक उत्सव साजरे होऊ लागले. किसननगर-१मध्ये स्थानिक तरुणांनी एकत्र येत सुरुवातीला वार्षिक सत्यनारायण पूजा सुरू केली. यानिमित्ताने एकत्र आलेल्या रहिवाशांनी बालमित्र गणेशोत्सव मंडळ, किसननगर-१ ठाणे (प) या मंडळाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. १९७६मध्ये देवेंद्र कारेकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या, ‘ठाण्याचा महाराजा’ म्हणून ओळख असलेल्या या मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

धार्मिक उपक्रमांबरोबरच मंडळाने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षात किसननगर परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे उपसचिव संतोष शिंदे यांनी दिली.
त्यावेळी किसननगर म्हणजे काही तुरळक चाळी आणि सभोवती जंगल असे स्वरूप होते. आता हा परिसर आमूलाग्र बदलला आहे. सुरुवातीला धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असे गणेशोत्सवाचे स्वरूप होते. मात्र पुढे काळानुरूप त्यात बदल होत गेले. स्थानिक मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभागी होतात. मंडळाची २५० सभासद कुटुंबे आहेत. आमदार रवींद्र फाटक हे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष असून दीपक वेतकर आणि डॉ. अभिजीत पांचाळ उपाध्यक्ष आहेत. येथील श्री गणेश ‘ठाण्याचा महाराजा’ म्हणून ओळखला जातो.

गणेशोत्सवाव्यतिरिक्त मंडळातर्फे अन्य काही उपक्रमही राबवले जातात. त्यातला एक ठळक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर. या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन शिबिर भरवले जाते. जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीकडून मंडळाची वाटचाल सुरू आहे.