Notorious Thief From Madhya Pradesh Caught For Burglaries In Nagpur
मध्य प्रदेशातून येऊन नागपुरात घरफोड्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : मध्य प्रदेशातून नागपुरात येऊन घरफोड्या करणाऱ्या कुख्यात चोरट्याला हिंगणा पोलिसांनी अटक केली. राहुल शिवदास राठोड (वय २४, रा. शिरपूर, ता. खकनार, जि. बुऱ्हानपूर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. राहुल नागपुरात येऊन भाड्याने खोली घेत असे. त्यानंतर कुलूपबंद घरे शोधून संधी साधत घरफोडी करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. काही दिवसांपूर्वी हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर येथे अनिल चरणबाबू चानपूरकर यांच्या व्ही. ए. चानपूरकर देशी दारू दुकानात घरफोडी करून रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे आणि त्यांच्या पथकाने तपास करून राहुलला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुलकडून घरफोडी व वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.