त्रिमूर्तीनगर रेसिडेंट्स ॲक्शन विंग फाउंडेशनने डीजेचा वापर, लाऊडस्पीकर आणि उत्सवांदरम्यान रस्त्यांवरील अतिक्रमण याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदी घालावी तसेच मिरवणुका आणि मंडपांमुळे रस्ते बंद करण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, डीजेचा आवाज आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील ध्वनिप्रदूषण यामुळे विविध वयोगटांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारांमुळे संपूर्ण शहर वेठीस धरले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी तुषार कोठारी, नीतिश चौधरी, राजेश दाचेवार, प्रवीण मोहोड, अमोल गांजापुरे, विवेक वैद्य, ॲड. अब्दुल सुभान, कृष्ण कुमार आदींनी निवेदनातून केली आहे.
गणेशोत्सवासह विविध उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश वापराविरोधात नागपुरात नागरिकांचा आवाज तीव्र होत आहे. उत्सवांचे पावित्र्य राखले जावे, ध्वनिप्रदूषणातून नागरिकांना होणारा त्रास थांबावा आणि नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.गेल्या काही वर्षांत सर्व धर्म-पंथांच्या उत्सवांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या मिरवणुका, त्यातील अतितीव्र आवाज आणि उत्सवांदरम्यान निर्माण होणारा उन्माद यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने नागपुरातही डीजेविरहित उत्सव साजरे व्हावेत, हा मुद्दा सातत्याने मांडला आहे. नागरिकांनी या भूमिकेला प्रतिसाद देत संपर्क साधून तसेच समाजमाध्यमांवरून ध्वनिप्रदूषणाविरोधातील भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
सार्वजनिक उत्सवांमधील उन्माद थांबावा आणि उत्सवांना पारंपरिक पावित्र्य पुन्हा प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. लोकांच्या मनातील ‘डीजे नकोच’ ही भावना लक्षात घेऊन सार्वजनिक मंडळे, संस्था आणि आयोजकांनीही आपल्या पद्धतींमध्ये बदल करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.