Warning Of Heavy Rain In Vidarbha Strong Start To The Monsoon
शहरासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहरासह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी, ३ सप्टेंबरला अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीसह वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यालाही गुरुवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून दमदार पावसाचा अंदाज आहे.
गुरुवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसासह वीज पडण्याची शक्यता आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून विदर्भातील बहुतांश भागांत वादळी पावसाची शक्यता कायम आहे.दरम्यान, बुधवारी नागपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. गुरुवारी काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने शहरांतील सखल भागात पाणी साचणे, अंडरपास बंद होणे आणि वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कच्चे रस्ते तसेच असुरक्षित संरचनांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.