Raghav Chadhas Rajya Sabha Membership In Jeopardy Controversy Over Shifted Registration
राघव चड्ढा अडचणीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भाजपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे नाव मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने गुरुवारी नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. पंजाबच्या प्रारूप मतदारयादीत चढ्ढा यांना ‘शिफ्टेड’ म्हणजेच दुसरीकडे स्थायिक झाल्याचे दाखवण्यात आले असून, त्यांचे नावच गाळण्यात आले आहे. चड्ढा यांनी या प्रकारासाठी आम आदमी पक्षाच्या पंजाब सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला आहे. मात्र, ‘आप’ने हा आरोप फेटाळून लावून एसआयआर पंजाब सरकार नव्हे, तर निवडणूक आयोग करत असल्याचे म्हटले आहे.
पंजाबमधील मतदारयादीत चड्ढा यांचे नाव ‘शिफ्टेड’ म्हणून नोंदवण्यात आल्याने त्यांचे २०२२पासूनचे राज्यसभा सदस्यत्व राहणार की जाणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. चड्ढा हे २०२२मध्ये आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. चड्ढा यांची मूळ मतदार नोंदणी यापूर्वी दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघात होती. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यानंतर २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आपली मतदार नोंदणी मोहाली येथे हलवली होती. २०२४च्या निवडणुकीत त्यांनी मोहालीत मतदान केल्याचेही सांगितले जाते.एसआयआरमधून नाव गाळल्यावर चड्ढा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून पंजाब सरकारवर आरोप केले. ‘ही अंतिम मतदारयादी नसून प्रारूप यादी आहे आणि त्यावर दावा-हरकती नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ऑक्टोबर २०२६मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदारयादीत माझे नाव चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत करण्यात आल्याची दुरुस्ती केली जाईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मला कायमस्वरूपी स्थलांतरित कोणी ठरवले?’ असा प्रश्नही त्यांनी केला. ‘मतदारयादीच्या पडताळणी प्रक्रियेत बूथ पातळीवरील अधिकाऱ्यापासून (बीएलओ) यंत्रणेतील अनेक अधिकारी पंजाब सरकारच्या प्रशासकीय व्यवस्थेतून येतात. या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना आणि सेवाविषयक बाबींवर राज्य सरकारचा प्रभाव असल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जाऊ शकतो व माझ्या प्रकरणात निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आले,’ असा आरोपही त्यांनी केला.
‘आप’ ने सारे आरोप फेटाळून एसआयआर कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिकारात येत नसल्याचे सांगितले. ‘आप’च्या प्रवक्त्याने या प्रकरणी आणखी एक गंभीर दावा केला. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चड्ढा आता राजेंद्रनगरमध्ये पूर्वलक्ष्यी दिनांक टाकून मतदार म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पक्षाला मिळाल्याचा दावा करण्यात आला. ही माहिती खरी असल्यास नोंदणीची चौकशी करून सत्य लोकांसमोर आणावे, अशी मागणीही या प्रवक्त्याने केली.
संसदीय नियमांनुसार, चड्ढांचे नाव प्रारूप मतदारयादीत ‘शिफ्टेड’ म्हणून नोंदले गेले आहे. एवढ्यावरून त्यांचे राज्यसभा सदस्यत्व त्वरित संपणार नाही. मात्र, पंजाबमधील त्यांची मतदार नोंदणी अंतिमतः रद्द झाली व त्यानंतर सदस्यत्वासाठी आवश्यक वैधानिक पात्रतेवर प्रश्न निर्माण झाला, तर सदस्यत्वाबाबत स्वतंत्र घटनात्मक व कायदेशीर प्रक्रिया लागू होऊ शकते. राज्यसभा सदस्य होण्यासाठी राज्यघटना आणि निवडणूक कायद्यांतील पात्रता पूर्ण करावी लागते. केवळ एखाद्या प्रारूप मतदारयादीतील नोंदीमुळे सदस्यत्व आपोआप रद्द होत नाही.