पुणे : नेत्रदान पंधरवड्यानिमित्त पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेने दृष्टिहीन कलाकारांसाठी विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले. गदिमा व बाबूजींच्या ‘गीतरामायण’मधील गीतांनी रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमातून दृष्टिहीन व्यक्तींच्या क्षमतेसोबतच सामाजिक योगदानाचा संदेशही देण्यात आला.
एमईएस बाल शिक्षण मंदिर शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दंतविकारतज्ज्ञ डॉ. भक्ती दातार, दृष्टिहीन कलाकार कविता भंडारे आणि अद्वैत मराठे यांनी ‘गीतरामायण’ सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. समीर दातार यांनी केले. कार्यक्रमातून मिळालेला निधी अमरावती येथील नॅशनल असोसिएशन फॉर फिजिकली हँडिकॅपच्या ब्रेल प्रिंटिंग प्रेसला देण्यात आला. डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते निधी सुपूर्द करण्यात आला. ‘दृष्टिहीन व्यक्ती दान स्वीकारण्याबरोबरच इतरांना दान देऊ शकते, हा दृष्टिकोन समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न होता,’ असे डॉ. समीर दातार यांनी सांगितले.