Celebrating The Joy Of Entertainment In Dahi Handi
मनरंजन मोहना!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कुळाष्टमी आली, तशी गल्लीतले वातावरण रंगायला लागले. जंगम गल्लीत वेणूभाई चाळीच्या चौथ्या मजल्यावर विज्यादादाची खोली होती. गेल्या वर्षीपर्यंत दहीहंडीचा सराव करणाऱ्या पोरांना विज्यादादा शिकवायचा. त्यांचा खुराक, जोर-बैठका यांवर त्याची करडी नजर असायची. टिंगलटवाळी करणाऱ्याला त्याच्या हातचा बेदम चोप बसायचा. अख्खी गल्ली दहीहंडीसाठी विज्यादादाच्या हातात आपली पोरं सोपवताना निर्धास्त असायची.
आज गुरुवार. रात्रीची जेवणे आटोपून समेळकाका येतील. मृदंगाला कणिक लागेल. चौथ्या मजल्यावरच्या कॉमन गॅलरीत माणसे गोळा होतील. टाळ-मृदंगाच्या ठेक्यात भजन रंगेल.‘किस्ना, थमाल ले, थमाल अपुल्या गाई!’
विज्यादादाच्या कानात भजनाचा नाद तीव्र होत घुमू लागला. तसा तो दचकून उठला. आपले दुबळे हात आधाराला घेत तो कॉटवर कसाबसा बसला. त्याचा सदरा घामाने भिजला होता. रात्रीचे दोन वाजले होते. दादाच्या डोळ्यांतून सरसर अश्रू वाहू लागले.
गेल्या वर्षीपर्यंत हातापायांच्या जोरकस पकडी, खांद्याचे बळकट स्नायू यांच्या आधारावर धो-धो पावसातसुद्धा पाय रोवून उभे राहता येते, हे त्याने पोरांना शिकवले होते. त्या जुन्या आठवणींच्या मुसळधार सरी थांबवण्याचा प्रयत्न विज्यादादा करत होता. रस्त्यावरच्या एका क्षुल्लक अपघातात त्याचा देह दुबळा पडला होता.
हुंदक्याचे कढ आतल्या आत जिरवण्याचा प्रयत्न विज्यादादाने केला; पण तरी एक हुंदका निसटलाच. दादाच्या कॉटशेजारी जमिनीवर वाकळ टाकून शालन थकूनभागून निजली होती. ती चटकन उठली.
‘काय झालं हो?’ म्हणत ती दादाच्या शेजारी बसली. तिने त्याची घालमेल ओळखली.
‘असं काय करता? अहो, काल सगळी पोरं भेटून गेली की नाही तुम्हाला? पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेऊन गेली. तेव्हा कसं हसूनखेळून खंबीर राहिलात! पोरांनी नारळ वाढवला इथेच. वर माझ्या हातचा चहा हट्ट करून मागून घेतला, खरं की नाही? मग डोळ्यांतून पाणी कशासाठी? नका रडू. जे आपल्या हातात नाही, त्याचं दुःख करू नका, मालक.’
शालन त्याच्या पाठीवर हात फिरवत राहिली.
जरा वेळाने ती उठली. तिने आंघोळीचे पाणी तापत ठेवले. केरवारे झाले. दोघांनी कढत चहा प्यायला. तिची आंघोळ झाली. गॅलरीतल्या तुळशीच्या जांभळ्या मंजिऱ्या तिने आणल्या आणि गोपाळकृष्णाला अर्पण केल्या. मग पोहे काढले. गूळपोहे, दहीपोहे, काकडीपोहे आळीतल्या पोरांना आवडतात. तिने काल्याचे टोप भरले. वर्षानुवर्षे जे चालू आहे, ते सुरू ठेवायला हवे. मालकांची उमेद टिकायला हवी.
गरम पाण्याने तिने विज्यादादाचे अंग खसखसून पुसून काढले. त्याचे कपडे बदलले. गोविंदाचा पिवळा टी-शर्ट चढवला. तपकिरी पाटलोण चढवली. डोक्याला त्रिकोणी पांढरा रुमाल बांधला. कमरेला पंचा बांधून दिला. एकमेकांच्या डोळ्यांत पाहत दोघे हसले.
दादा मनानेच गल्लीत पोहोचला. खालच्या थरात पाय रोवून उभा राहिला. चौथीत शिकणाऱ्या मयूरला त्याने मिठी मारली. त्याचा सर्वांत लहान चेला होता मयूर. सगळ्या गोविंदांच्या जीवाचे फूल होता मयूर. थर चढण्यासाठी मयूर जमिनीवर दोन पायांत अंतर ठेवून हसत उभा राहायचा, आत्मविश्वासाने पाहायचा, तेव्हा त्याच्या सावळ्या रूपाची भूल सर्वांना पडायची. त्याचे खट्याळपण धीरगंभीर चेहऱ्यात बदलायचे. स्थिर मनाने एकाग्र होऊन मयूर अलगद सहा थर चढून वर जायचा.
विज्यादादाने त्याला स्वतःचा पावा बक्षीस दिला होता. विज्यादादाच्या आजोबांनी कोकणात स्वतः तयार केलेला पावा होता तो. तोच पावा कंबरेला बांधून मयूर हंडी फोडायचा. तेव्हा संपूर्ण जंगम गल्लीत जल्लोष व्हायचा.
भूतकाळ उमाळा होऊन विज्यादादाच्या डोळ्यांतून वाहू लागला. त्याने बाहेर पाहिले, तर चौथ्या मजल्यावरची झाडून सारी माणसे, त्याची शालनसुद्धा गॅलरीत उत्सुकतेने दहीहंडी पाहत उभी होती. तिथे जाणे आपल्या दुबळ्या शरीराला शक्य नाही, या भावनेने दादा व्याकूळ झाला.
पण ‘गोविंदा रे गोपाळाचे’ हे बेभान सूर त्याच्या कानात घुमले आणि क्षणात काहीतरी घडले. दादाच्या पायाची बोटे थरथरली. दुबळ्या हातांचा आधार घेत कॉटवरून दादा कणाकणाने पुढे सरकू लागला. त्याची पावले खाली टेकली, तसा फरशीचा थंडगार स्पर्श त्याच्या पाठीच्या कण्यांतून सरसरत गेला. तो शहारला.
कॉटचा कठडा एका हाताने पकडत त्याने दोन्ही पावले फरशीवर रुतवली. गोविंदाचा दणदणाट कानात भरून घेत त्याचे एक पाऊल फरशीवर घासत पुढे गेले. मग शिवणाचे मशीन, भिंत, दाराची चौकट पकडत विज्यादादा सरपट पावले टाकत व्हरांड्याच्या भिंतीला बिलगून उभा राहिला.
‘शालेऽऽऽ!’
विज्यादादाने हाक मारली, तशी तिने गर्रकन मागे पाहिले. पाहते तर मालक बाहेर आले होते. ताबडतोब दोन्ही हात पुढे करून तिने मालकांना आपल्या देहाचा आणि भिंतीचा आधार देत उभे केले.
बाहेर चौथ्या थरावरून गोविंदा कोलमडत होता. ते दादाने पाहिले आणि तो मोठ्याने हसत ओरडला,
‘गोविंदा रे गोपाळा!’
पोरं सहज हंडी फोडतील, हे त्याला अनुभवाने माहीत होते. पुन्हा पहिला, दुसरा, चौथा, पाचवा थर लागला. मयूर तिसऱ्या थरावर चढला, ते दादाने पाहिले. तो समाधानाने हसला. तोपर्यंत मयूर सहाव्या थरापर्यंत पोहोचला. मग विज्यादादाच्या खोलीकडे त्याने कटाक्ष टाकला. नारळ घेऊन त्याने हंडी फोडली. दही-दुधाचे तुषार एका हातावर घेतले आणि दादाच्या खोलीच्या दिशेने शिंपले. जणू गुरूला अर्पण केलेला प्रसाद होता तो.
दहीहंडी फुटली.
‘ढाक्कुमाकुम! ढाक्कुमाकुम!’
जल्लोष शिगेला पोहोचला. तितक्यात लोकांचे लक्ष दादा-शालनकडे गेले. आनंदाने ते बेभान झाले. विज्यादादा बाहेर आल्याची बातमी सांगायला गल्लीत धावाधाव सुरू झाली. पंढरीकाका मृदंग-टाळ आणायला पळाले. समेळदादांनी विज्यादादाला व्हरांड्यातल्या लेझिमींच्या पेटाऱ्यावर बसवले.
गल्लीतल्या गोविंदांनी विज्यादादा बाहेर आल्याची खबर ऐकली आणि ते नाचू लागले.
‘बोल बजरंग बली की जय!’
गुलालाच्या संगतीने पाऊस रंगीत झाला. चौथ्या मजल्यावर, जिन्यावर गल्ली दाटीवाटीने गोळा झाली. शालनकाकीने केलेल्या दहीकाल्याचा फडशा पोरांनी उडवला. मग मृदंगावर जोरदार थाप पडली. टाळ वाजू लागले.
मयूर विज्यादादाशेजारी येऊन बसला. दहीहंडीच्या खापराचा तुकडा त्याने विज्यादादाच्या हातात ठेवला. दही-दुधात माखलेली ती खापरी दादाने श्रद्धेने मस्तकी टेकवली. थरथरत्या हाताने भोवती जमलेल्या गोविंदांना नमस्कार केला.