‘दुर्गराज्या’च्या देखा व्यातून जनजागृतीचा जागर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘दुर्गराज्या’च्या देखा‌व्यातून जनजागृतीचा जागर
किल्ले केवळ दगडांनी उभे राहत नाहीत, तर त्यामागील दूरदृष्टी, नियोजन आणि शिस्तीतून सामर्थ्यशाली दुर्गराज्याची निर्मिती होते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवत ठाण्यातील श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘दुर्गराज्य’ ही संकल्पना साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, नियोजनकौशल्य आणि स्वराज्य उभारणीचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला आहे.

‘किल्ले उभे राहिले दगडांनी; पण दुर्गराज्य उभे राहिले दूरदृष्टीने,’ या संकल्पनेतून इतिहासातील प्रेरणादायी विचारांना उत्सवाच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. केवळ सजावट आणि धार्मिक विधींपुरता गणेशोत्सव मर्यादित न ठेवता, त्यातून संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यावर मंडळाने भर दिला आहे.
केवळ विचारांची मांडणीच नव्हे, तर कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा वसा जपण्यात हे मंडळ ठाणे शहरात नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. गेल्या तब्बल ५६ वर्षांपासून शाडू मातीचीच पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती स्थापन करण्याचा ऐतिहासिक वारसा श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने अत्यंत निष्ठेने जपला आहे. याशिवाय, गेल्या १५ वर्षांपासून सजावटीमध्ये कोणत्याही प्रकारचा थर्माकोल, प्लास्टिक किंवा रासायनिक घटकांचा वापर न करता केवळ नैसर्गिक साहित्याचा वापर करून देखावे उभारले जातात. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच निसर्गाप्रती असलेली जबाबदारीही उत्सवाच्या केंद्रस्थानी राहिली आहे

शिवविचारांचा मेळ

‘किल्ले उभे राहिले दगडांनी; पण दुर्गराज्य उभे राहिले दूरदृष्टीने,’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेतून मंडळाने शिवकालीन व्यवस्थापनाचा पट मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांची उभारणी करताना केवळ भौगोलिक सीमांचे रक्षण पाहिले नाही, तर जलव्यवस्थापन, निसर्गरक्षण, गुप्तवार्ता आणि रयतेचे कल्याण या सर्व घटकांचा सूक्ष्म विचार केला होता. महाराजांचे हेच व्यवस्थापन कौशल्य, दूरगामी धोरण आणि स्वराज्य उभारणीचे सूत्र आधुनिक पिढीने आपल्या दैनंदिन जीवनात व करिअरमध्ये कसे अंगीकारावे, याचे प्रत्यक्ष प्रबोधन या देखाव्यातून घडवून आणण्याचा मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा, इतिहास आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणाऱ्या या गणेशोत्सवातून संस्कारांची आणि विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मंडळाचे मुख्य कार्याध्यक्ष प्रमोद सावंत व शिशिल मोकाशी, अध्यक्ष राहुल सावंत, सचिव ओंकार पाटणे आणि खजिनदार नीरज खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.