घरच्या गणपतीला जुन्या वैभवाचा साज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाऊचा धक्का उभारणाऱ्या अजिंक्य कुटुंबाचा १८२ वर्षांचा गणेशोत्सवदीडशे वर्षांपूर्वीचा चौरंग, समया, पूजेच्या भांड्यांपासून पारंपरिक आरास

घरच्या गणपतीला जुन्या वैभवाचा साज
दीडशे वर्षांपूर्वीचा चौरंग, समया,

पूजेच्या भांड्यांपासून पारंपरिक आरास
बईकरांना ‘भाऊचा धक्का’ हे नाव चांगलेच परिचित आहे. मात्र, हा धक्का उभारणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांचे नाव अनेकांना ठाऊक नसेल. देश-परदेशातून येणाऱ्या मालवाहतूक बोटींसाठी आणि कोकणातील प्रवाशांसाठी बंदर उभारणाऱ्या याच भाऊंच्या घरात सुरू झालेला घरगुती गणेशोत्सव यंदा १८२व्या वर्षात पदार्पण करत आहे. काळ बदलला, वास्तव्य बदलले, पिढ्या बदलल्या; मात्र अजिंक्य कुटुंबातील गणेशोत्सवात आजही पावणेदोनशे वर्षांपूर्वी भाऊंनी वापरलेल्या वस्तूंनी आरास करून आठवणी जपत उत्सव साजरा केला जात आहे.

भाऊंनी १८४५मध्ये नातवाच्या जन्माच्या आनंदाप्रीत्यर्थ घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून सात पिढ्यांनी ही परंपरा जपली आहे. सन १८४५ ते १८९५ या काळात गिरगावमध्ये, १८९६ ते १९३५ या काळात परळमध्ये आणि १९३६ पासून दादरच्या प्रताप मॅन्शन येथे हा गणपती विराजमान होत आहे. भाऊंचे नातू विनायक रामचंद्र अजिंक्य हे मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या तुकडीतील नामनियुक्त नगरसेवक होते.

या गणपतीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे आरास. लाकडी आणि मिश्रधातूचे चौरंग, पितळेच्या मोठ्या समया, रिद्धी-सिद्धी, हरणाच्या आकाराची उदबत्तीची घरे, लामण दिवे आणि त्या काळातील रॉकेलवर चालणारे दिवे आजही जपून ठेवले आहेत. पूजेतील पंचामृताची भांडी मोगलकालीन चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन तयार करण्यात आली आहेत. गणपतीमागील आरसा हस्तकलेचा नमुना असून पितळेच्या झांजा पत्रा ठोकून तयार केलेल्या आहेत. तांबे, पितळ, बीड, जर्मन सिल्वर आणि चिनी मातीच्या जुन्या वस्तू पाहताना दर्शनासाठी येणाऱ्यांना इतिहासात डोकावल्याचा अनुभव येतो.

गणेश चतुर्थीच्या पंधरा-वीस दिवस आधीच अजिंक्य कुटुंबात उत्सवाची तयारी सुरू होते. दर वर्षी एकाच प्रकारची शाडूची मूर्ती आणली जाते. घराच्या दारात आरती करून गणरायाचे स्वागत केले जाते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा आणि पूजा कुटुंबीय स्वतः करतात. गणपतीसोबत गौरीही येत असल्याने कधी पाच, कधी सहा, तर काही वर्षी सात दिवस गणरायाचे वास्तव्य असते. ‘या सहा दिवसांची ऊर्जा आम्हाला वर्षभर पुरते’, असे अजिंक्य कुटुंबीय सांगतात. उत्सव संपल्यानंतर पूजेची भांडी, समया, दिवे आणि चौरंग पुन्हा कापडात गुंडाळून मोठ्या लाकडी पेटाऱ्यात ठेवले जातात. हा पेटारा थेट पुढच्या वर्षी गणेशोत्सवात उघडला जातो.