Indian Mens Team Loses To Uzbekistan Nihal Sarins Expensive Blunder
निहाल सरीनची घोडचूक महागात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हाल सरीनच्या दुर्दैवी पराभवामुळे भारतीय पुरुष संघाला बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सहाव्या फेरीत यजमान उझबेकिस्तान ‘अ’ संघाकडून १.५ - २.५ अशी हार पत्करावी लागली. पाचव्या फेरीतील अनपेक्षित पराभवानंतर महिला संघाने स्वतःला सावरून पुन्हा एकदा वंतिका अग्रवाल आणि सविताश्रीच्या विजयामुळे अमेरिकेला ३-१ असे हरवले.
काहीशा अनवट पद्धतीने सुरुवात करणाऱ्या निहालने नोदीरबेक याकूबऐव्ह विरुद्ध ३४व्या चालीअखेर थोडासा वरचष्मा मिळवला होता. मात्र, त्याची ३५वी चाल म्हणजे त्याच्या आयुष्यातील सर्वांत महाग घोडचूक ठरावी. याकूबऐव्हने संधी साधून निहालचा वजीर सापळ्यात पकडला आणि नंतर निहालने खूप प्रयत्न करूनही त्याला हार मानावीच लागली. अशा पद्धतीने उझबेक संघाने २०१४मध्ये भारताकडून ट्रॉम्सो येथील ऑलिम्पियाड मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.अर्जुन एरिगेसी आणि जगज्जेतेपदाचा आव्हानवीर जोवाखीर सिंदारोव्ह यांच्या खेळाची शैली आक्रमक असल्यामुळे त्यांच्या डावाकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, दोघांनीही संघासाठी संथ खेळ केला आणि बरोबरी घेतली. आर. प्रज्ञानंद आणि डी. गुकेशनेदेखील जास्त धोका पत्करला नाही. बहुधा निहालच्या पटावर तो सुस्थितीत असल्यामुळे त्यांनी तसे केले असावे; पण निहालच्या पराभवामुळे भारतीय संघाची निराशा झाली.
महिलांमध्ये आशियाई विजेत्या सविताश्रीने आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. सविताश्रीचा जोश बघता तिला यापुढे सगळे डाव विश्रांतीशिवाय खेळवले जातील, असे वाटते. अमेरिकेकडून पहिल्यांदाच खेळणाऱ्या रोझ अटवेलला सविताने आपल्या मोहऱ्यांची सुयोग्य सांगड घालून तिची दोन प्यादी खाल्ली आणि लवकरच रोझ शरण आली.
आपल्या आवडत्या इंग्लिश प्रकाराने सुरुवात करणाऱ्या वंतिकाने सुरुवातीपासूनच डावावर पकड घेतली. एक प्यादे मिळाल्यावर वंतिकाने मोहरामोहरी करून इरिना क्रशला २०२४ नंतर लागोपाठ दुसऱ्यांदा पराभूत केले. हम्पी आणि दिव्या देशमुख यांनी धोका न पत्करता आपले डाव बरोबरीत सोडवले. मंगळवारी विश्रांतीचा दिवस असल्यामुळे भारतीय पुरुष संघाला सावरण्यास आणि आपले उरलेल्या पाच डावातील डावपेच आखण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.