५८६ कोटींचा संरक्षण करार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
५८६ कोटींचा संरक्षण करार
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी टी-७२ आणि टी-९० रणगाड्यांसाठी ‘ऑक्सिलरी पॉवर युनिट्स’ ( एपीयू ) खरेदी करण्याबाबत ५८६ कोटी रुपयांचा करार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराची यांत्रिक कार्यसज्जता आणि विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

दिल्लीत संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत ‘अक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड’सोबत करार करण्यात आला. ‘एपीयू’ हा रणगाड्यांच्या आग नियंत्रण यंत्रणा, ‘फायरिंग सर्किट’, ‘गन स्टॅबिलायझेशन’ आणि इतर सहाय्यक यंत्रणांसाठी विद्युत उर्जा निर्माण करणारा एक पर्यायी स्रोत आहे. ही खरेदी लढाऊ बाबींच्या उप-प्रणालींच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, उद्योग नेतृत्वाखालील संशोधन आणि विकास दर्शवते, असे निवेदनात म्हटले आहे. ‘हा करार स्वदेशी नाविन्यपूर्ण संकल्पनांचे उत्पादन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये रूपांतरित करण्याच्या यंत्रणेची परिणामकतादेखील दर्शवतो,’ असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. ‘करार सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेशी सुसंगत असून, संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या, तसेच एक सक्षम, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारतीय संरक्षण उद्योग उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे,’ असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.