गणेशोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले भाविक भारावले
‘जीवाची मुंबई’ही
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीमध्ये गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक उत्सवही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. मुंबईच्या विविध भागांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची विविध रूपे पाहण्यासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक शहरात दाखल होतात. गणरायाची विविध रूपे पाहून हरखून गेल्याची भावना या भाविकांनी व्यक्त केली.अमरावतीहून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेला मोहित जोशी परळ येथे राहणाऱ्या मित्राकडे मुक्कामाला आहे. मोहित मूळचा अमरावतीचा. ‘आमच्याकडे घरोघरी गणपती असतात. मात्र मुंबईच्या गणेशोत्सवाबद्दल, इथल्या वातावरणाबद्दल मित्रमंडळींकडून बरेच ऐकले होते. त्यामुळे कुतूहल होते. मित्राने आग्रह केला म्हणून यंदा मुंबईला आलो,’ असे तो सांगतो. परळ, लालबागसह पश्चिम उपनगरांतील काही छोट्या सार्वजनिक गणेश मंडळांनाही त्याने भेट दिली. काही मंडळांचा साधेपणा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव पाहून तो भारावून गेला; तर काही ठिकाणची गर्दी पाहून गोंधळल्याचेही त्याने सांगितले.
गौरी-गणपतीला निरोप दिल्यानंतर आता कोकणातील काही स्थानिकही मुंबईत आले आहेत. ‘बाप्पाला निरोप देताना मुंबई भक्तिरंगात न्हाऊन निघते. जागोजागी गणरायाच्या नावाचा गजर सुरू असतो. समुद्रकिनाऱ्यांवर भाविकांची अलोट गर्दी असते. ही दृश्ये सोशल मीडियावर पाहिली होती,’ असे ज्योत्स्ना महाडीक सांगतात. कोकणातील गणेशोत्सव नितांत सुंदर असला, तरी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव कसा असतो, हे पाहण्याची उत्सुकता असल्याने त्या मुंबईत आल्या. तरुणांचा सहभाग, शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि हजारोंच्या गर्दीचे व्यवस्थापन पाहून त्या थक्क झाल्या.
‘जीवाची मुंबई’ही
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या अनेक भाविकांनी शहरातील प्रेक्षणीय स्थळांनाही भेटी दिल्या. मरिन ड्राइव्ह, मुंबई विद्यापीठ परिसर, राणीचा बाग, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अशा ठिकाणी बच्चेकंपनीसह आवर्जून भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘गणेशोत्सव पाहण्यासोबतच यानिमित्ताने जीवाची मुंबईही केली,’ अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. पुण्याहून शनिवारी निघून शनिवार-रविवार गणेशोत्सव आणि मुंबई दर्शन असा बेतही काहींनी आखला होता. जीएसबी गणेशोत्सव मंडळाचे माजी सचिव सतीश रामा नायक यांनी सांगितले की, केवळ राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी आणि गणेशसेवा करण्यासाठी येतात. परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही पाचशेहून अधिक असते.