मंथनची पखवाज साधना!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नोकरी सांभाळत जपली तीन पिढ्यांची परंपरा

मंथनची पखवाज साधना!
दिवसभर लॅपटॉपसमोर बसून कॉर्पोरेट जगतातील कामाचा ताळमेळ साधायचा आणि उत्सवांची चाहूल लागताच हातात पखवाज घेऊन परंपरेत रमायचे... आजच्या ‘जेन-झी’ तरुणांसाठी ही दोन टोके वाटू शकतात, मात्र अलिबागच्या झिराडपाड्यातील २५ वर्षीय मंथन गावडे या दोन्ही विश्वांमध्ये अगदी सहज वावरतो. सध्या तो मुंबईत नेरोलॅक पेंट्समध्ये एसएपी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून तीन पिढ्यांची पखवाज वादनाची परंपरा पुढे नेत आहे.

मंथनचे आजोबा नामदेव सखाराम गावडे आणि वसंत सखाराम गावडे हे दोघेही पखवाज वादक. वडील, काका आणि इतर नातेवाइकांनाही वादनाची आवड आहे. बालपणापासूनच मंथन या वातावरणात वाढला. साधारण २०१३मध्ये सातवीत असताना त्याने गुरू जगदीश पाटील यांच्याकडून पखवाजाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. जवळपास पाच वर्षे त्याने हे शिक्षण घेतले. पुढे दहावीमुळे औपचारिक शिक्षण थांबले, पण पखवाजाचा सराव मात्र थांबला नाही. पुढे मंथनने भौतिकशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली.
मंथन हा ‘झिरेश्वरी प्रासादिक भजन मंडळ, झिराडपाडा-अलिबाग’ या मंडळातून गणेशोत्सवात, तसेच रामनवमी, हनुमान जयंती अशा उत्सवांमध्ये वादन करतो. विशेष म्हणजे त्याची चुलत बहीण ‘संगीत विशारद’ असून काकांचा मुलगा भजन मंडळाचा गायक आहे. गावडे कुटुंबातील सुमारे ७५ ते ८० जण गणेशोत्सवासाठी एकत्र येतात.

‘गणपतीच्या दिवसांत मंडळाच्या हद्दीतील घरांमध्ये आम्ही विनामूल्य पखवाज वादन करतो. आता परिस्थितीनुसार काही कुटुंबे रोख मानधन देतात. मात्र ते पैसे पेटी, पखवाज, टाळ यांच्या देखभालीसाठीही त्याचा उपयोग होतो. पखवाजातून व्यावसायिक कमाई करण्याचा आमचा उद्देश नाही. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, कुटुंबातील माणसं एकत्र यावीत आणि आमच्यातला हा एकोप्याचा धागा कायम राहावा, यासाठीच हे वादन करतो,’ अशी मंथनची भावना आहे.