‘उत्सवातील विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घ्या’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काळाचौकी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीच्या गणेश मंडळांना सूचना

‘उत्सवातील विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घ्या’
काळाचौकी येथे गणेशोत्सवाच्या परिसरात विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा मृत्यू, तर काही भाविक जखमी झाल्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असून, विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे समितीने स्पष्ट केले आहे.

बेस्ट प्रशासनाच्या आवाहनानुसार, समितीने मंडळांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. संपूर्ण विद्युत यंत्रणेचा कनेक्टेड लोड मंजूर भाराच्या मर्यादेपेक्षा अधिक नसावा. मुख्य तारा, केबल, स्विच आदींची क्षमता कनेक्टेड लोडच्या प्रमाणात असावी. प्रत्येक विद्युत उपकरणासाठी योग्य आणि स्वतंत्र अर्थिंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्युत जोडणीसाठी ईएलसीबी उपकरण बसविणे आणि त्याची कार्यक्षमता तपासणे अनिवार्य असल्याचे समितीने म्हटले आहे.
मुख्य विद्युत तारा पीव्हीसी इन्सुलेशन असलेल्या असाव्यात आणि त्या योग्य पाइप किंवा ट्युबमधून सुरक्षितपणे नेण्यात याव्यात. मुख्य तारांना शक्यतो जोड देऊ नयेत. जोड देणे अपरिहार्य असल्यास योग्य कनेक्टरसह जंक्शन बॉक्सचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मुख्य वीजवाहिन्या परिसराच्या बाहेरून नेण्याची आवश्यकता असल्यास योग्य क्षमतेच्या केबलचा वापर करावा. प्रत्येक विद्युत जोडणीची परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून तपासणी करून घ्यावी आणि मागणी केल्यास त्याचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून द्यावा, असेही समितीने नमूद केले आहे.

मंडळांना विद्युत जोडण्या सवलतीच्या शुल्कात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे अनेकदा स्टॉलधारक मंडळांकडून वीजजोडणी घेतात. मात्र या जोडण्यांची कामे परवानाधारक कंत्राटदारांकडून केली जात नाहीत आणि त्यात त्रुटी राहतात. अशा त्रुटींमुळे अपघात घडू शकतात, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

पावसाळ्यात किंवा ओलसर वातावरणात विद्युत सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढते. त्यामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या वीजजोडण्या, स्टॉल, प्रकाशयोजना किंवा उघड्या तारांची व्यवस्था राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. मंडपातील विद्युत व्यवस्था सुरक्षित आहे की नाही, याची पुन्हा तपासणी करावी. त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त होईपर्यंत संबंधित विद्युत जोडणी वापरू नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी केले आहे.