मुरबाडला पर्यटन तालुक्याचे वेध

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुरबाडला पर्यटन तालुक्याचे वेध
सह्याद्रीच्या डोंगररांगा, माळशेज, नाणेघाट आणि दऱ्या हे घाटमार्ग, डोंगरदऱ्यांमध्ये नांदणारी वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती, बारवी, मुरबाडी, कनकवीरा आदी नद्यांनी समृद्ध प्रदेश आणि लहान-मोठी धरणे अशा निसर्गसंपन्न मुरबाडला पर्यटन तालुका म्हणून दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटन संचालनालय आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुरबाड तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार आता सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. ठाणे, मुंबईतून एका दिवसात सहजपणे जाऊन येता येईल इतक्या अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. विशेषतः पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झाल्यास त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय ऐतिहासिक नाणेघाट, दऱ्या घाट, घनदाट अरण्ये आणि काळू धबधब्यासारखी साहसी पर्यटनस्थळे तालुक्यात आहेत. नाणेघाट आणि दऱ्या घाट हे प्राचीन व्यापारी मार्ग आहेत. सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड यांसारखे शिवकालीन किल्लेही तालुक्यात आहेत. म्हसा येथील खांब लिंगेश्वर मंदिर परिसरात जानेवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी जत्रा भरते. या जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मुंबई, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे आदी भागांतून यात्रेकरू आणि व्यापारी जत्रेला येतात.

पाडाळे, पवाळे, बारवी धरण आणि काळू नदीपात्रात बोटिंग, हाऊसबोट व फ्लोटिंग सुविधा यांसारख्या जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे. धसई गावाजवळील पळू-सोनावळे येथे डोंगरात ‘गणेश गडद’ ही प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण लेणी आहेत. तालुक्यात संगमेश्वर मंदिरासह अनेक प्राचीन देवस्थाने आहेत.